लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल दोन महिन्यांपासून बंद असलेली शहराची बाजारपेठ सोमवारपासून पुन्हा नव्या दमाने व नव्या आशेने उघडली. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना संपला नाही. मात्र, काळजी आवश्यक असल्याचे सांगत शहरातील व्यापारी बांधवांनी जिल्हा व मनपा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमातच राहूून सोमवारी आपला व्यवसाय केला.
राज्य शासनाने सोमवारपासून पुन्हा सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. यामुळे एकाच वेळी गर्दी झाल्याने फुले मार्केट परिसर, सुभाष चौक परिसर, टॉवर चौक, नवी पेठ, गोलाणी मार्केट या भागात नागरिकांची गर्दी झाली.
दुपारी २ वाजेनंतर गर्दी झाली कमी
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्यास केवळ दुपारी २ वाजेपर्यंतची परवानगी दिली होती. त्याचीच सवय म्हणून सोमवारी सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली असतानादेखील दुपारी २ वाजेनंतर पुन्हा दुकाने बंद होतील, असा समज झाल्यामुळे दुपारी २ वाजल्यानंतर बाजारातील नागरिकांची गर्दी कमी झाली. तसेच काही दुकानदारांनी देखील कारवाईच्या भीतीने दुपारी २ वाजेनंतर दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने निर्बंध उठविले असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा दुकाने सुरू झाली. दरम्यान, शहरातील सर्व दुकाने उघडल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडीचा सामनादेखील नागरिकांना करावा लागला.
हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदीच
जिल्हा प्रशासनाने शहरातील मार्केटमधील दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली, तरी शहरातील मुख्य रस्त्यालगत व्यवसाय करण्यास हॉकर्सला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारीदेखील सुभाष चौक, शिवाजी रोड, बळीराम पेठ या भागात व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर मनपाकडून ही कारवाई करण्यात आली.
प्रतिक्रिया :-
राज्य सरकारने परिस्थितीनुसार खूप योग्य निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. संक्रमण खूप आटोक्यात आले. आता सर्व व्यवहार खुले करावेत, अशी मागणी मागील एक आठवड्यापासून आम्ही करीत होतो. अनलाॅकमुळे काही प्रमाणात अर्थचक्र सुरू होण्यास वाव आहे. सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना नियमाचे पालन करावे.
-दिलीप गांधी, उपाध्यक्ष, राज्य कॅट संघटना.
दोन महिन्यांनंतर पुन्हा बाजारपेठ सुरू झाल्यामुळे बाजारात उत्साह पाहायला मिळाला. सर्व व्यापारी प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत आहेत. ग्राहकांचे आरोग्यदेखील आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व खबरदारी घेऊनच आम्ही व्यवसाय करत आहोत.
- रमेश मतानी, अध्यक्ष, फुले मार्केट असोसिएशन
बाजारातील निर्बंध उठल्यामुळे नागरिकांसह सर्व व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह भविष्यात देखील कायम राहावा यासाठी नागरिकांसह आम्ही सर्व व्यापारीदेखील प्रयत्नशील राहणार आहोत.
- पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ अध्यक्ष, कॅट संघटना.
आज पहिल्याच दिवशी बाजारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाचा संभाव्य धोका, तिसरी लाट रोखण्यासाठी व पुढील लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांनी पालन करावे.
-ललित बरडिया, सचिव, जिल्हा व्यापारी महामंडळ