अग्निशमन विभागात ५० लाखांचे साहित्य खरेदी करण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:39+5:302021-01-25T04:16:39+5:30
जळगाव : महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला शासनाकडून ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीबाबत महापौर भारती सोनवणे ...
जळगाव : महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला शासनाकडून ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीबाबत महापौर भारती सोनवणे यांनी शनिवारी दुपारी मनपात अग्निशमन विभागाची बैठक घेऊन तत्काळ अग्निशमन विभागाने साहित्य खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.
काही दिवसांपूर्वी मनपा अग्निशमन विभागात दोन नवीन बंब दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा या विभागात साहित्य खरेदीसाठी शासनाकडून ५० लाखांचा निधी मनपाला नुकताच प्राप्त झाला आहे. सध्या अग्निशमन विभागात कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे, याबाबत महापौरांनी शनिवारी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांनी सध्या उपलब्ध असलेल्या साधनांबाबत महापौरांना माहिती दिली. यावेळी महापौरांनी या निधीतून नवीन ५० लाखांचे साहित्य खरेदीबाबत तत्काळ प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. तसेच संबंधित विभागाला सूचना करण्यासाठी मनपा आयुक्तांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
इन्फो :
या अत्यानुधिक साहित्याची होणार खरेदी
मनपाला प्राप्त झालेल्या ५० लाखांच्या निधीतून अरुंद गल्लीत आग विझविण्यासाठी ३६ लाख रुपये किमतीच्या ३ अग्निशमन अत्याधुनिक दुचाकी, आगीत घुसून अडकलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविणारे ६ लाख २५ हजारांचे ५ फायर प्रोक्सीमिटी सूट, २ लाख रुपये किमतीचे धूर ओढून घेणारे यंत्र, मनुष्यबळाची मदत न घेता कार्यरत राहणारे २ लाखाचे एक पोर्टेबल ग्राऊंड वॉटर मीटर, आगीवर पाणी मारणारे विविध प्रकारचे १ लाख ७५ हजारांचे ७ नोझल, दरवाजा तोडणारे दीड लाख रुपये किमतीचे १ डोअर ब्रेकर व अंधारात उजेडासाठी आवश्यक असलेले ४९ हजार ५०० रुपयांचे ९ सर्चलाईट खरेदी केले जाणार आहेत.