स्मशानभूमीतील ओट्यांची संख्या वाढवण्याचे महापौरांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:03+5:302021-04-12T04:14:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू होत आहेत. यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने, अनेकांना खाली अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात असल्याने, या स्मशानभूमीत सात अतिरिक्त ओटे वाढवण्याचा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे. तसेच काही ठिकाणी हे लोकसहभागातून तयार करण्यात येतील, अशीही माहिती महापौरांनी दिली आहे.
शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमीत एकूण आठ ओटे असून, मृतदेहांची संख्या वाढल्याने हे ओटे आता कमी पडत आहेत. अनेकांना मृतदेह आणून ओट्यांसाठी तासभर वाट पहावी लागत आहे. तर अनेकांना ओट्यांच्या खालीच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शहरातील परिस्थिती गंभीर होत जात असल्याने आता नेरी नाका स्मशानभूमीत सात अतिरिक्त ओटे तयार करण्यात येणार आहेत. महापौर जयश्री महाजन यांनी याबाबत मनपा प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच काही ओट्यांसाठी काही सामाजिक संस्थादेखील तयार आहेत. यामुळे येत्या चार दिवसात नेरी नाका स्मशानभूमीत अतिरिक्त ओटे तयार करण्यात येणार आहेत. याबाबत सोमवारी महापौर जयश्री महाजन नेरी नाका स्मशानभूमीची पाहणी करणार आहेत. तसेच मेहरूण परिसरातील स्मशानभूमीवर देखील काही ओट्याची संख्या वाढविण्यात येणार असल्याचीही माहिती महापौरांनी दिली.
परिस्थिती झाली गंभीर
शहरातील परिस्थिती आता गंभीर होत जात असून, नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर शहरातील शिवाजीनगर व मेहरूण परिसराचे स्मशानभूमीवरदेखील दररोज मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. शहरात दिवसाला ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे होत आहे. याआधी शहरात दिवसाला दहा ते बारा इतक्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात ही संख्या ५० पर्यंत पोहोचल्याने शहरातील परिस्थिती आता गंभीर स्वरूप घेताना दिसून येत आहेत. प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी दाखवली जात असली तरी शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणारे मृतदेहांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनासमोर चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.