वैद्यकीय व्यवसाय- एक संघर्ष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:11 PM2019-07-04T12:11:56+5:302019-07-04T12:12:25+5:30
वैद्यकीय व्यवसायाची स्थिती पाहिली तर त्याविषयी लिहिताना विचार केला, डॉक्टर देव की दानव ?, डॉक्टर खुनी की चोर ?, ...
वैद्यकीय व्यवसायाची स्थिती पाहिली तर त्याविषयी लिहिताना विचार केला, डॉक्टर देव की दानव ?, डॉक्टर खुनी की चोर ?, डॉक्टर म्हणजे रग्गड पैसा ! अशी तर भावना सर्वांची झाली नाही ना. मात्र डॉक्टर होण्यासाठी जो संघर्ष डॉक्टरांना करावा लागतो तो कुठल्याच क्षेत्रात होत नसावा हे निश्चित. सुरुवात होतेच मुळी एमबीबीएसच्या प्रवेशाच्या वेळी. प्रवेश प्रक्रिया दिवसेंदिवस इतकी गुंतागुंतीची व किचकट करुन ठेवलेली आहे की सामान्यांच्या मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे जिकिरीचे झाले आहे. प्रवेश मिळाला तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अभ्यासासाठी रुग्ण, यंत्रसामुग्री निश्चित आहे पण प्राध्यापक वर्ग पुरेसा नसतो. तेथून उत्तीर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर प्रवेशासाठी पुन्हा प्रवेश परीक्षेच्या तयारीचा संघर्ष, नंतर पुढे एक ते दोन वर्ष शासकीय बंधपत्र पूर्ण करण्यासाठी शासकीय सेवेत तोकड्या वेतनावर रुजू होणे असा हा बारा वर्षांचा वनवास पूर्ण केल्यानंतर डॉक्टर स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बघू लागतो. आता मात्र संघर्षाच्या वेदना जाणवू लागतात. रुग्णाच्या उपचाराचा तणाव, स्पर्धा, अपेक्षा, राजकीय कार्यकर्ते व इतरांच्या धमक्या यामुळे खासगी वैद्यकीय सेवा व व्यवसाय करणे जिकिरीचे झाले. एकेकाळी डॉक्टरांना दिलेले देवपण, आता खुनी, राक्षस व स्वर्गाचे दार अशा शब्दात रुपांतरीत झाले आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे. हे प्रमाण कमी होणे गरजेचे असून तसे झाल्यासच योग्य संवाद होऊ शकतो व मोठा संघर्ष करून इथपर्यंत पोहचलेल्या डॉक्टरांच्याही सेवेची भावना खऱ्या अर्थाने मार्गी लागू शकते.
- डॉ विलास भोळे, माजी सचिव आयएमए, जळगाव