सर्व त्रुटी दूर करून यंदा जळगावात वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:33 AM2018-01-13T11:33:17+5:302018-01-13T11:39:36+5:30
संचालक प्रवीण शिनगारे यांची माहिती
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13- जळगाव येथे सुरू होणा:या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेदरम्यान दिल्ली येथील पथकाने दाखविलेल्या सर्व त्रुटी दूर करून येथे यंदा वैद्यकीय शिक्षणास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रवीण शिनगारे यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास त्यांनी भेट देऊन विविध त्रुटींची पाहणी केली.
दिल्लीच्या पथकाने काढल्या होत्या 19 त्रुटी
जळगावात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून होत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून येथे विविध कामांना वेग आला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी तेथे पुरेसा सुविधा असणे गरजेचे असून त्या असल्या तरच मान्यता मिळते. त्यानुसार पाहणी करण्यासाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पथकाने 21 नोव्हेंबर जिल्हा रुग्णालयास ‘सरप्राईज’ भेट दिली देऊन आवश्यक पूर्तता आहे की नाही याची पाहणी केली होती. त्या वेळी पथकाने सादर केलेल्या अहवालात 19 त्रुटी नमूद केलेल्या होत्या.
त्या पाश्र्वभूमीवर 12 जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रवीण शिनगारे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन येथील सर्व विभागांची तसेच खाली केलेल्या निवासस्थांची पाहणी केली. यामध्ये प्रयोग शाळा, बाह्य रुग्ण कक्ष, उपचाराचे प्रात्यक्षिक कक्ष अशा विविध बाबींमध्ये दिल्लीच्या पथकाने 19 त्रुटी काढल्या होत्या. या सर्व बाबी कोणत्या ठिकाणी असावे याविषयी आज पाहणी करण्यात येऊन चर्चा करण्यात आली.
सर्व त्रुटी दूर करणार
या भेटी दरम्यान शिनगारे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, दिल्ली येथील पथकाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यांची पाहणी करण्यासाठी आलो असून त्या दूर करून यंदापासून वैद्यकीय शिक्षणास प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या वेळी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते. पाहणी नंतर त्यांनी अधिका:यांची बैठक घेतली. यामध्ये त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.