भुसावळ : जीवनात आपण सर्व काही हरलो, असे जेव्हा आपल्याला वाटत असेल तेव्हासुद्धा आपल्याला नवीन सुरुवात करता येते. त्यासाठी आपले मन, मेंदू व मनगट बळकट असणे गरजेचे असते. शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व भयानक असते. मानसिक अपंगत्व टाळण्यासाठी आपण आपले मन, मेंदू व मनगट बळकट करावे, असे आवाहन दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गोष्ट अरूणिमाची’ या पाठाच्या लेखिका सुप्रिया खोत कुलकर्णी यांनी केले.जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या आॅनलाईन संवाद सत्राच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसºया सत्रात त्या बोलत होत्या.शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुप्रिया खोत म्हणाल्या की, अरूणिमा सिन्हा हे एक आदर्श उदाहरण विद्यार्थ्यांसमोर या पाठाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. अपघातामुळे अपंगत्व येऊनही अरूणिमाने हार न मानता एव्हरेस्ट हे सर्वाेच्च शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तिने आपले स्वप्न सत्यातदेखील उतरवले. त्यामुळे ध्येय साध्य करताना अडचणी आल्या तरी त्या ओलांडून ध्येयाची वाटचाल अखंडितपणे सुरू ठेवली पाहिजे. अरूणिमाची गोष्ट वाचताना वाचकांना संताप, दु:ख व अभिमान अशा तिन्ही भावनांचा अनुभव येतो. तिच्या दोन्ही पायावरून रात्रभर ४९ रेल्वे गेल्याचे तिने आपल्या डोळ्यांनी पाहिले. त्यावेळी तिच्या पायाचा चक्काचूर झालेला असतानासुद्धा मेंदू मात्र शाबूत होता. याच मेंदूने आणि सकारात्मक मनाने तिने मनगट बळकट करीत एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर गाठले. विद्यार्थ्यांसाठी अशी प्रेरणादायी कथा लिहिल्यावर ती छात्र प्रबोधनमधून प्रसिद्ध झाली व त्यानंतर ती दहावी पाठ्यपुस्तकात घेतली असल्याचे लेखिका सुप्रिया खोत यांनी सांगितले.अरूणिमा सिन्हा यांच्या अपघाताचा प्रसंग, त्यानंतर तिने एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी केलेले प्रचंड प्रयत्न यांचे चित्तथरारक वर्णन ऐकताना अंगावर रोमांच उभा राहत होता आणि डोळ्यात अश्रूदेखील तराळत होते. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या.
मन, मेंदू व मनगट बळकटीकरणातून टळते मानसिक अपंगत्व -सुप्रिया खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 2:48 PM
मानसिक अपंगत्व टाळण्यासाठी आपण आपले मन, मेंदू व मनगट बळकट करावे, असे आवाहन लेखिका सुप्रिया खोत कुलकर्णी यांनी केले.
ठळक मुद्देअरूणिमा सिन्हा यांच्या एव्हरेस्ट शिखर गाठण्याचे केले चित्तथरारक वर्णनतिसरा टप्पा - आॅनलाईन संवाद सत्र २