मानसिक सुदृढता जास्त महत्त्वाची…
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:18+5:302021-05-31T04:13:18+5:30
मुळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजाराची तीव्रता ही फक्त मानसिक आरोग्याच्या वाईट स्थितीमुळे काही पटीने जास्त तीव्र होऊ शकते. ...
मुळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजाराची तीव्रता ही फक्त मानसिक आरोग्याच्या वाईट स्थितीमुळे काही पटीने जास्त तीव्र होऊ शकते. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे सर्वांनीच प्राधान्याने व हेतूपुरस्सर लक्ष दिल्यास कोरोना या शारीरिक आजाराशी आपण प्रभावीपणे यशस्वी लढा देऊ शकतो.
‘मन चिंती ते वैरी न चिंती’ या उक्तीप्रमाणे फक्त कोरोना झालाय, एवढे समजताच अनेक नकारात्मक विचार, भीती, अस्वस्थता, काळजी या सर्वांनी मनात थैमान घातल्याने चिंता (अँक्झायटी) आजाराची तीव्रता अनेक पटीने वाढत आहे. ही भीती सर्वप्रथम काढून टाकली पाहिजे.
वैयक्तिक पातळीवरदेखील सर्वजण मास्क, शिल्ड, स्वच्छता, योग्य आहार, आदींची काळजी घेत आहेतच, परंतु त्यासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी काही उपाय करणेदेखील आवश्यक आहे. जसे की घरीच व्यायाम, प्राणायाम, ध्यान, शरीर शिथिलीकरण, योगनिद्रा, कुटुंबीयांशी सुसंवाद, घरातच विविध खेळ, पुरेशी शांत झोप, आळस झटकून दिवसभराचे योग्य शेड्यूल ठरविणे, गाणी, पेंटिंग, आदी छंद जोपासणे वगैरे. ही जागतिक महामारीची लाट ओसरेपर्यंत सर्वांना त्रास होणारच, हे लक्षात घेणे आवश्यक असून हा आजार झालाच तर या आजाराचे स्वरूप समजावून घेऊन निर्धाराने व सकारात्मक विचाराने त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आजारी व्यक्तीला इतरांनी हसत-खेळवत व तणावमुक्त ठेवावे लागेल. मनातील विवेकी विचार हीच सर्वांत मोठी शक्ती असल्याने त्याला ताब्यात ठेवत हे सर्व उपाय करावे लागतील. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावे लागेल. चला तर मग आपण सर्वजण मिळून कोरोना या महामारीला अतिशय निर्धाराने सामोरे जाऊन सकारात्मक व विवेकी विचारांनी आपल्या सर्वांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवूया व या संकटांवर यशस्वी मात करूया.
- डॉ. हर्षदा दिलीप पाटील,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,
वाघळी, ता. चाळीसगाव.