खेडगाव ,ता.भडगाव : नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद व हरणबारी धरण क्षेत्रात श्रावणातील पहिल्याच सोमवारी वरुणराजाने अखंड जलाभिषेक केल्याने, ५० हजारावर क्युसेस इतका विसर्ग गिरणा धरणात होत, धरण याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता ३२ टक्क्यावर पोहोचले आहे. रविवारी संध्याकाळी धरणात १५.३० टक्के उपयुक्त जलसाठा होता. २४ तासात १७ टक्के असा जलसाठा वाढला आहे.दरम्यान, शनिवारी मोसम नदीवरील हरणबारी धरण भरल्यानंतर सोमवारी केळझर धरण ओव्हरफ्लो होत विसर्ग वाढला.गिरणा धरणात ५८४४ दलघफु उपयुक्त झाला आहे. मृतसाठा ३००० दलघफु धरुन जलसाठा ८८४४ दलघफु इतका होतो. यापूर्वी गिरणा खोऱ्यात पाऊस पडावा म्हणून कुठे धोंडी काढत, कुठे महादेवाचा गाभारा पाण्याने भरत वरुणराजाची आळवणी सुरू होती. आजही श्रावण सोमवारचा मुहूर्त साधत गिरणा काठालगतच्या ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात गिरणा धरणात जलसाठा होऊ दे म्हणत शेतकऱ्यांनी महादेवाला साकडे घातले होते. आता गिरणा धरणाच्या वाढत्या जलसाठ्याचे वृत्त येताच महादेव पावला, असा भाव व्यक्त होत समाधान पसरले आहे.
गिरणा धरणात २४ तासात १७ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 7:20 PM