चार फायर चुकविले, पाचवी गोळी शिरली खांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:17 AM2021-07-30T04:17:05+5:302021-07-30T04:17:05+5:30
जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या अशोक शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पळासखेडा शिवारात त्यांचे शेत असून त्यांच्या बाजूला चुलत ...
जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या अशोक शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पळासखेडा शिवारात त्यांचे शेत असून त्यांच्या बाजूला चुलत भाऊ विजय दोधा पाटील यांचे शेत आहे. दोघांच्या शेताच्या मधोमध बांध असून शेतरस्ता आहे. वडिलोपार्जित असलेल्या शेतरस्त्यावरून दोघांमध्ये जुने वाद आहेत. नेहमीप्रमाणे गुरुवारी १२ वाजेच्या सुमारास आई सुशिलाबाई व भाऊ किशोर पाटील यांच्यासोबत शेतरस्त्यावरून बैलगाडी घेऊन शेतात जात असताना विजय पाटील हा तेथे आला. त्याने, तुला किती वेळा सांगितले आहे की, माझ्या शेतरस्त्यावरून जायचे नाही. खाली उतर आणि याचठिकाणी बैलगाडी सोड, असे म्हणत वाद घातला.
झटापटीत खांद्यात मारली गोळी
अशोक व विजय या दोघांमध्ये झटापट झाली. यावेळी विजय याने त्याच्याकडील असलेल्या पिस्तुलातून चार राऊंड फायर केले. ते चुकविले. विजय याला कमरेला धरून ठेवल्याने त्याने पाचवा राऊंड वरून अशोकच्या खांद्याच्या खाली फायर केला. त्यानंतर आई सुशिलाबाई व किशोर यांनाही त्याने मारहाण केली. या घटनेनंतर आई व भावाने तत्काळ अशोक यास भडगाव येथील रुग्णालयात नेले, तर तेथून दुपारी दीड वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तातडीने पाठीचा एक्स रे काढण्यात आला. त्यात खांद्याच्या खाली बंदुकीची रुतलेली गोळी दिसून येत आहे. ही बंदुकीची गोळी शस्त्रक्रिया काढून काढावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गोळीबार करणारा संघटनेचा पदाधिकारी
गोळीबार करणारा विजय पाटील हा अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचा भडगाव तालुका अध्यक्ष आहे. त्याच्या कमरेला नेहमी पिस्तूल असते. त्या आधारावरच विजय हा गावात नेहमी दादागिरी करतो. त्याचे पिस्तूल जप्त करावे व कठोर कारवाई करावी, अशी मागणी अशोक यांनी केली.