भुसावळात गुन्हेगारांवर ‘मिशन सर्जिकल अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:06+5:302021-08-01T04:17:06+5:30

शिकारी बंदूक, तलवारी व चाकू जप्त शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रायफल, बंदुका, ...

'Mission Surgical Attack' on criminals in Bhusawal | भुसावळात गुन्हेगारांवर ‘मिशन सर्जिकल अटॅक’

भुसावळात गुन्हेगारांवर ‘मिशन सर्जिकल अटॅक’

Next

शिकारी बंदूक, तलवारी व चाकू जप्त

शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रायफल, बंदुका, तलवारी आणि चाकूंसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी साठा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.

शहरातील संशयास्पद पार्श्‍वभूमी असणाऱ्या लोकांच्या घराची झडती घेण्याची परवानगी वरिष्ठ पातळीवरून मागण्यात आली होती. बाजारपेठ पोलीस ठाण्याची दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या संशयास्पद घरांवर छापे टाकले.

या कारवाईत मुस्लीम कॉलनी भागातील ईदगाहसमोर राहणारा शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. याची खातरजमा करून पथकाने छापा मारला. शेख याच्या घराजवळच्या शेडमध्ये मोठा साठा मिळाला. यात चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदूक आदींचा समावेश आहे. पोलीस पथकाने हा साठा जप्त करून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, हेडकॉन्स्टेबल जयराम मोरे, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्‍हाडे, कृष्णा देशमुख, समाधान पाटील, प्रशांत सोनार, मीना कोळी, जयेंद्र पगारे यांच्या पथकाने केली. दरम्यान, या प्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.

आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल

याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात कर्मचारी प्रशांत निळकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीवरून मोबाईल लांबवणारे भामटे ताब्यात

मॉर्निंग तसेच इव्हीनिंग वॉक करणाऱ्यांच्या हातातून दुचाकीवर येऊन मोबाईल लांबवणाऱ्या भामट्यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीचे पाच मोबाईल त्यांच्याकडून जप्त केले. सागर राकेश आढाळे (१९) व भूषण समाधान सपकाळे (१९, दोन्ही रा. आंबेडकर नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अन्य एका अल्पवयीन संशयितासही ताब्यात घेण्यात आले आहे.

‘मिशन सर्जिकल अटॅक’

बाजारपेठ पोलिसांनी ‘मिशन सर्जिकल अटॅक’ ऑपरेशन शुक्रवारी मध्यरात्रीनंतर व शनिवारी पहाटे दरम्यान राबविले. संशयित दुचाकी एमएच-१९-डब्ल्यू-२२४ वरून सुंदर नगर भागातून जात असताना बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अडवत त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. संशयितानी शंकर भवानी तिवारी (६०, संभाजी नगर, भुसावळ) यांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. तिवारी हे २९ रोजी रात्री ८.१५ वाजता वरणगाव रोडवरील संभाजीनगर ते रामायण नगर दरम्यान पायी जात असताना संशयितानी दुचाकीवरून येत १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला होता. या गुन्ह्यातील मोबाईल चोरट्यांकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, हवालदार रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, सुभाष साबळे व पथकाने केली.

दरम्यान, शहर व बाजारपेठ हद्दीतील यापूर्वीही मोबाईलसह इतर मौल्यवान वस्तू दुचाकीवरून या टोळीने लांबविले तर नाही? याबाबत सखोल चौकशीनंतर इतर घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 'Mission Surgical Attack' on criminals in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.