ममुराबादला मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:43+5:302021-03-05T04:16:43+5:30
ममुराबाद : शहरात कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीअंशी प्रयत्न होत असतांना दुसरीकडे गावात दिवसागणिक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे ...
ममुराबाद
: शहरात कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीअंशी प्रयत्न
होत असतांना दुसरीकडे गावात दिवसागणिक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत
असल्याचे दिसून आले आहे. मोकाट कुत्र्यांमुळे आबालवृद्धांना रात्रीच्या
अंधारात तसेच दिवसा उजेडी रस्त्याने सहजपणे वावरणे मुश्कील झाले असून
ग्रामस्थ कमालीचे भयभीत झाले आहेत.
गावात गेल्या काही दिवसांपासून
अनोळखी कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या
कुत्र्यांकडून हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. त्यात कित्येक बालके व ग्रामस्थ
जखमी झाले आहेत. शहरात स्वतः महापालिका कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी
पुढाकार घेते. गावात ग्रामपंचायतीमध्ये तशी कोणतीच व्यवस्था नसल्याने मोकाट
कुत्रे या विषयाकडे डोळेझाक केली जाते. मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात
ठेवण्यात स्थानिक प्रशासन कमकुवत ठरल्याचे दिसून येते. बऱ्याच भागात अस्वच्छता आहे, उकिरड्यावर अन्न टाकले जाते तिथे भटक्या
कुत्र्यांची संख्या वाढते.
-------------
कुत्र्यांचे निर्बीजीकरण का नाही ?
भटक्या
कुत्र्यांपासून असणारा धोका कमी करण्यासाठी काही ग्रामस्थांनी मागे धरपकड
मोहीम राबविली होती. त्याअंतर्गत पकडलेले कुत्रे दूर अंतरावर सोडून देण्यात
आले होते. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा कुत्र्यांची संख्या पूर्ववत
झाल्याने धरपकड मोहिमेचा काहीच उपयोग होऊ शकलेला नाही.
महानगरपालिकांप्रमाणे ग्रामपंचायतीकडून निर्बीजीकरणासाठी मदत मिळाल्यास
मोकाट कुत्र्यांची समस्या सुटू शकते. त्यादृष्टीने प्रयत्नांना
कृतीची जोड देण्याची मागणी त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.