मतदानानंतरचा महिना : उमेदवारांनी दिला गाठीभेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:41 PM2019-05-22T12:41:15+5:302019-05-22T12:41:43+5:30

कुणी बाहेरगावी घालविली सुटी

Month of polling: Candidates pay attention to visitation | मतदानानंतरचा महिना : उमेदवारांनी दिला गाठीभेटींवर भर

मतदानानंतरचा महिना : उमेदवारांनी दिला गाठीभेटींवर भर

Next

जळगाव/धुळे/नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जळगाव, धुळे, रावेर, नंदुबार या चारही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना निकालासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागली. या महिनाभरात काही उमेदवारांनी बाहेरगावी, तर काहींनी परदेशात जाऊन सुट्टी घालविली. तर बहुतांश उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवरच भर दिल्याचे दिसून आले.
रक्षा खडसेंनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी
भाजपाच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी मतदान आटोपल्यावर विविध गावांना जाऊन मतदारांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. मुंबईत मुले शिकायला असतात. काही काळ त्यांच्या समवेत घालवला. आता मतदार संघात विवाह सोहळे आहेत, तेथे जाऊन गाठीभेटी घेणे सुरू आहे.
डॉ.उल्हास पाटील यांनी दिल्या अनेक गावांना भेटी
कॉँग्रेसचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी काही गावांना भेटी दिल्या. कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधला. अनेक सामाजिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळे, सुख, दु:खाच्या ठिकाणांना भेटी देणे अविरत चालूच आहे. उर्वरित वेळ रूग्णसेवेत घालविल्याचे सांगितले.
उन्मेश पाटील यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद
जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी प्रमुख गावांना जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. केंद्राशी संबंधीत विविध विभागांशी संबंधीत कामांची यादी करून त्याची ब्लु प्रिंट तयार केली आहे. म्हाळगी प्रबोधिनीला भेट देऊन काही विषयांवर अभ्यास केला.
देवकरांनी दिल्या विविध गावांना भेटी
जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मतदार संघात जाऊन गाठी-भेटी घेतल्या. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गावागावात होणारे लग्न समारंभ, द्वारदर्शन अशा ठिकाणीही भेटी दिल्या. मुंबईत दोन वेळा पक्ष बैठकांनाही हजेरी लावली.
डॉ.सुभाष भामरेंनी पूर्ण केली प्र्रलंबित कामे
धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आभार व्यक्त केले. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर दिला. तत्पूर्वी दोन-तीन दिवस विश्राम केला. त्यानंतर पुढील नियोजन केले.
आमदार कुणाल पाटील यांचा भेटीगाठींवर भर
धुळे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मतदान आटोपल्यानंतर पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. मतदारसंघातील लग्नसोहळ्यांना नेहमीप्रमाणे उपस्थिती दिली. आलेल्या कार्यकर्ते, नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविल्या. यात बराच कालावधी गेला. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून बैठकींसाठी मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित झालो असल्याचे सांगितले.
अनिल गोटे यांनी दिले शेतीकडे लक्ष
धुळे मतदार संघातील भाजपाचे बंडखोर उमेदवार अनिल गोटे यांनी शहरालगत असलेल्या शेतामध्ये जाऊन तेथील पिके, झाडे याकडे लक्ष दिले. तेथे पाळलेल्या कुत्र्यांसोबत राहिलो, रमलो. त्यांच्या आवश्यक गरजा व उपचारांकडे लक्ष पुरविले. वेळोवेळी कार्यबाहुल्यामुळे राहून गेलेल्या व आवडणाºया पुस्तकांचे वाचन केले. लिखाणाचे कामही केले. या दरम्यान बाहेरगावी कुठेही गेलो नाही, असे सांगितले.
डॉ.हीना गावित सुटी घालविण्यासाठी विदेशात
मतदान आटोपल्यावर विद्यमान खासदार डॉ.हीना गावीत यांनी कार्यकर्त्यांच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. याच काळात पिता आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या डोळ्यांवर मुंबईत शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यासोबत रुग्णालयात काही दिवस त्या होत्या. त्यानंतर आईसोबत सुटी घालवण्यासाठी त्या विदेशात गेल्या आहेत.
अ‍ॅड.पाडवी यांनी लावली कार्यक्रमांना हजेरी
नंदुरबार मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी मतदानानंतर आपल्या असली, ता.धडगाव या गावाकडे सुटी घालवली. कार्यकर्त्यांकडील लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. पक्षाच्या मुंबई येथील बैठकीसाठीही ते गेले होते.
डॉ.नटावदकर नंदुरबारातच
अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांनीही नंदुरबारातच राहून लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना हजेरी लावली. याच काळात शेतकऱ्यांच्या एका मोर्चातही ते सहभागी झाले होते.

Web Title: Month of polling: Candidates pay attention to visitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव