भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची गिनिज बुकात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 09:55 PM2021-02-24T21:55:39+5:302021-02-24T21:56:36+5:30

वर्ल्ड रेकॉर्ड : ९८ तासात १८ हजार चौरस फुटात साकारली कलाकृती

Mosaic portrait of Bhavarlal Jain recorded in Guinness Book | भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची गिनिज बुकात नोंद

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची गिनिज बुकात नोंद

googlenewsNext

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांची जैन पाईप्सचा उपयोग करून प्रदीप भोसले यांनी साकारलेल्या मोजेक प्रकारातील पोर्ट्रेटची  गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनी याची नोंद घेऊन भवरलाल जैन यांच्या  स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाजागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. या कलाकृतीचे गुरुवारी लोकार्पण होणार आहे. 
जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी जळगावातील जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फूट अशी भवरलाल जैन यांची भव्य मोजेक प्रकारातील कलाकृती साकारली. जागतिक नामांकन प्राप्त केलेली ही कलाकृती सलग ९८ तासात साकार झाली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनीही याची नोंद घेतली. ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आली असून भाऊंच्या सृष्टीतील ‘भाऊंच्या वाटिके’त ती प्रेक्षकांसाठी उपलब्ध राहणार आहे.  
सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास काम
काळा, करडा, पांढरा या रंगांच्या पीई व पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून मनोहारी आणि भव्य कलाकृती साकारली आहे. भवरलाल जैन यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला त्या पाईप्सपासून मोजेक स्वरूपात ही कलाकृती साकार केली आहे. या पोर्ट्रेटसाठी पीई पाईप २५ मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास असे एकूण ९८ तास अर्थात पाच हजार ८८० मिनिट, ३ तीन लाख ५२ हजार ८०० सेकंदात या मोजेक स्वरूपाची कलाकृती साकारली. या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास २१.९ किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते.
असा झाला पोर्ट्रेटचा जागतिक विक्रम...
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. त्यानुसार ज्याठिकाणी विक्रम होत असतात अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पूर्ण होईपर्यंत व्हिडीओ चित्रण करण्यात येते. तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या तुकड्याने प्रत्येक व्हिडोओची बारकाईने नोंद घेण्यात येते. अशीच नोंद या पोर्ट्रेटसाठीसुध्दा घेण्यात आली. या जागतिक विक्रमाच्या नोंदीसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्यावतीने स्वप्नील डांगरीकर (नाशिक) व निखील शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी कोरोनामुळे ही पूर्ण कलाकृती ऑनलाईन पाहिली. याशिवाय गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने जळगाव येथील आर्किटेक शिरीष बर्वे यांची सर्व्हेयर म्हणून नेमणूक केली होती. त्यांच्यासह प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे हे या जागतिक विक्रमाचे साक्षीदार म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने नेमणूक केली होती. स्वप्नील डांगरीकर यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले.

विश्वविक्रमी कलाकृती सदैव प्रेरणा देणारी- अशोक जैन
कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी भवरलाल जैन यांच्या जन्मदिनी ही कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रीडांगणावर साकारली होती. ती कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीतआता ही कलाकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा खरोखरच आनंददायी आहे. भवरलाल जैन यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण आणि प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहिल, अशा भावना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Mosaic portrait of Bhavarlal Jain recorded in Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव