फोटो..
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खोटेनगरात वास्तव्यास असलेल्या किशोर भाऊलाल पाटील (३२) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मृताची आई दिव्यांग तर वडिलांचे निधन झालेले आहे. त्यात तरुणाने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर पाटील हा तरुण चांदसणी, ता.चोपडा येथील मूळ रहिवासी होता. जळगाव शहरातील पिंप्राळा येथील सासुरवाडी असल्याने तो रोजगारासाठी शहरात आला होता. खोटेनगरातील प्लाॅट नंबर ११३ मध्ये हिरा गौरी या घरात पत्नी शैलेजा, मुलगा प्रेम व मुलगी खुशी यांच्यासह वास्तव्याला होता. बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रविवारी रात्री १० वाजता घरी कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नी व शेजाऱ्यांनी धाव घेतली. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चांदसणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार विश्वनाथ गायकवाड यांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
आई दिव्यांग, तर वडिलांचे निधन
किशोर याचे वडील भावलाल पाटील यांचे निधन झालेले आहे, तर आई कांताबाई हिच्या अंगावर वीज पडली होती, तेव्हापासून ती दिव्यांग झालेली आहे. आई व लहान भाऊ दादू मूळगावी चांचणी येथे वास्तव्याला आहेत.