Chalisgaon Flood: चाळीसगावच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविले; एसडीआरएफची टीम दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:43 PM2021-08-31T13:43:09+5:302021-08-31T13:44:28+5:30
Chalisgaon Flood, Rain: शहर व ग्रामीण भागात महापूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले आहे.
चाळीसगाव जि. जळगाव : चाळीसगाव शहरातील बहुतांश भागाला महापुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. स्थिती गंभीर झाली आहे.प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांसाठी नेताजी चौकातील आनंदीबाई बंकट विद्यालयात मदत कक्ष सुरु केला आहे. न.पा.ची टीम यासाठी सर्तक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही शाळांमध्ये नागरिकांना हलविण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.
शहर व ग्रामीण भागात महापूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले आहे. कन्नड घाटातील दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. कन्नड घाटातील वाहतूक थांबविण्यात आली आहे. प्रवाशी वाहने व मालवाहू वाहने नांदगाव व सिल्लोडमार्गे जळगावकडे वळविण्यात आली आहे.
#WATCH | Maharashtra: Extensive waterlogging in several parts of Chalisgaon area in Jalgaon district due to heavy rainfall. Vehicular movement affected due to a landslide in Kannad Ghat. pic.twitter.com/2WLTmS5VrN
— ANI (@ANI) August 31, 2021
घाटाच्या मध्ये काही प्रवासी अडकून पडले आहेत. ग्रामीण भागातही तातडीची मदत पोहचविण्याचे प्रशसनासमोर आव्हान आहे. मंगळवारी रात्री ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने शहरात सर्वत्र पाणी साचले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कडधान्ये, बाजरी, ज्वारी, फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.