जळगाव : शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर आता नागरिक आक्रमक होत असून, बहुजन मुक्ती पार्टीकडून रस्त्यांच्या प्रश्नासह डेंग्यूची वाढत जाणारी रुग्णसंख्या, शिवाजीनगर उड्डाणपुलाचे रखडलेले काम या प्रश्नांवर गुरुवारी मनपासमोर सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीकडून करण्यात आले आहे.
गिरणेला पूर
जळगाव : पावसाळा सुरू झाल्यापासून गिरणा धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे यंदा गिरणा नदीला पूर आला नव्हता. मात्र, चाळीसगाव तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तितुर नदीला आलेल्या पुराचे पाणी गिरणा नदीला मिळाल्याने गिरणा नदीला देखील मोठा पूर आला आहे. यामुळे गिरणा काठावरील गावांना काही प्रमाणात फायदा होणार आहे. गिरणेला आलेल्या पुरामुळे आव्हाणे शिवारात सुरू असलेल्या बायपासचे काम थांबले आहे.
कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
जळगाव - ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अतिक्रमण कारवाईदरम्यान काही हॉकर्सनी केलेल्या हल्ल्याचा निषेध मनपा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत मनपा कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, प्रशांत पाटील, कपिल पवार आदी उपस्थित होते.