बाळू चव्हाण
वरणगाव, ता. भुसावळ जळगावपासून विदर्भातील मलकापूर चिखलीपर्यंत
महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. बरेचशे काम झालेही आहे. मात्र, वाहनधारक हे आपली वाहने सुसाट वेगाने पळवत असल्यामुळे तसेच वारंवार महामार्गाची एक बाजू बंद करण्यात येत असल्याने या महामार्गावर अपघातही वाढले आहेत. केवळ वरणगाव - मुक्ताईनगरदरम्यान दीडच महिन्यांत दहा जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांना आवरा !
संबंधित यंत्रणेने याची दखल घेत महामार्गावर ठिकठिकाणी वेगमापन यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी परिसरातील सुज्ञांनी केली आहे. याचबरोबर एकमार्गी वाहतुकीच्या ठिकाणी ठळक सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.
अशी असावी वेगमर्यादा...
वास्तविक महामार्गावर वाहतूक नियमांप्रमाणे वेगवेगळ्या वाहनांच्या वेगमर्यादा ठरवून दिल्या आहेत. त्यात ट्रकसह इतर अवजड वाहनांची मर्यादा जलद महामार्गावर ताशी १२० किमी, राष्ट्रीय महामार्गावर ताशी १०० किमी व शहरी भागात ताशी ७० किमीचा वेग ठरवून दिला आहे. तसेच, दुचाकी व छोटी चारचाकी वाहने यांचीसुद्धा वेगमर्यादा चढावाच्या रस्त्यावर ताशी ४५ किमी व ताशी ७०/६०/५० किमीप्रमाणे ठरवून दिली आहे. याकडे मात्र कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. प्रत्येकाला पुढे जायची घाई असते व क्षणात होत्याचे नव्हते घडते. यामुळे प्रत्येक वाहनधारकाने सुद्धा वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
फुलगावजवळ डेंजर झोन
या महामार्गावर भुसावळ ते मुक्ताईनगरदरम्यान वरणगाव परिसरात सर्वांत मोठा दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल फुलगाव येथील रेल्वे गेटजवळ आहे आणि याच ठिकाणी वाहनधारकांचा अंदाज चुकून मागून धडक देण्यासह समोरासमोर धडक देण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. त्यामुळे जवळजवळ सहा ते सात अपघातात सुमारे दहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, सर्व्हिस रोडवर वाहन नेल्यावर त्यावरील विखुरलेल्या खडीमुळे वाहने घसरून लहान-मोठे अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे.
वरणगावी जाण्यासाठी वेगळा मार्ग हवा
फुलगावजवळ वरणगावाकडे अथवा फुलगावकडे वळताना उड्डाणपुलावरील रहदारी उलट किंवा सुलट नेहमी एक मार्ग बंद करण्यात येत असतो. नेमके या ठिकाणी वाहनधारक गोंधळून अपघात होतात. महामार्ग प्राधिकरणाने वरणगाव शहरात जाण्यासाठी उड्डाणपुलावरून खाली उतरण्याचा मार्ग तयार करणे गरजेचे आहे. तसेच, महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे देखील महत्त्वाचे आहे. महामार्ग प्राधिकरणाने वरणगाव शहरात व फुलगावात जाण्यासाठी सर्व्हिस रोड बनवावा, अशी मागणी होत आहे.
अशी घडली अपघातांची मालिका
कपिलवस्ती नगर ते बोहर्डी ही वरणगावची हद्द येत असून, या परिसरात दीड महिन्यात सहा अपघातांत दहा जणांना प्राण गमवावे लागले आहे.
२५ मे रोजी फुलगाव उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून तळवेलचे तीन तरुण ठार झाले.
१४ जून रोजी फुलगाव उड्डाणपुलाजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने फुलगावचा तरुण ठार झाला.
१५ जून रोजी फुलगाव ते जाडगावदरम्यान मोटारसायकल घसरल्याने एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला.
३ जुलै रोजी कपिलवस्ती नगरजवळ कंटेनर व लक्झरीच्या धडकेत एकाचा मृत्यू होऊन ३० जण जखमी झाले.
११ जुलै रोजी जाडगाव फाट्याजवळ ट्रकने मोटारसायकलीस धडक दिल्याने पिंपळगाव बुद्रूक येथील सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या दरम्यान रावेर तालुक्यातील गाते येथील बहीण व भाऊ स्विफ्ट कारच्या धडकेने जागीच ठार झाले.
पोलिसांनी केले आवाहन
राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षा पथकाचे भुसावळ - वरणगाव - मुक्ताईनगर भागाचे प्रमुख स. पो. नि. सुनील मेढे (जळगाव) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महामार्ग पोलिसांच्या गाडीमध्ये वेग मोजमाप करणारे संयंत्र बसविलेले असते. त्यावरील स्वयंचलित यंत्रणेवर वेगाचे आपोआप मोजमाप होऊन वाहनधारकांस ऑनलाइन दंडाचा मेमो जातो. त्याला तो भरावाच लागतो. आमची गाडी एका ठिकाणी न थांबता महामार्गावर भ्रमण करीत असते व एक गाडीही तळवेलच्या पुढे नागराणी पेट्रोल पंपाच्या आसपास उभी असते. प्रत्येक लहान-मोठ्या वाहनधारकांनी स्वतःला काबूत ठेवून नियमाप्रमाणे वाहने चालविल्यास नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल. याची दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महामार्गावरील फुलगावजवळचा हाच परिसर डेंजर झोन बनला आहे.