मनपा कर्मचाऱ्यांचा ‘लंच टाईम’ अन् दुकानदारांचा ‘ओव्हरटाईम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:56 PM2020-06-23T12:56:23+5:302020-06-23T12:56:49+5:30
७ दुकाने सील, १४ हॉकर्सचे साहित्य केले जप्त
जळगाव : लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी शहरात सम-विषम पध्दतीनेच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांना न घाबरता अनेक दुकानदार आपला व्यवसाय सुरु केला आहे. आता मनपा कर्मचाºयांच्या जेवणाची वेळ लक्षात घेवून अनेक जणांनी व्यवसाय सुरु ठेवल्याचे प्रकार सुरु आहेत. हेच हेरून सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाने विविध भागातील ७ दुकाने सील करण्यात आली तर १४ हॉकर्सवरदेखील कारवाई केली.
मनपाचे पथक एका भागाकडून दूसरीकडे कारवाईला गेल्यानंतर इतर भागातील दुसरे दुकान उघडले जात असते. हीच स्थिती हॉकर्सची देखील आहे. मनपाचे पथक ख्वॉजामिया परिसरात पोहचल्यानंतर बळीराम पेठ, सुभाष चौकातील व्यवसाय सुरु होतात. तर हेच पथक बळीराम पेठेत पोहचले की ख्वॉजामिया चौकातील हॉकर्सची दुकाने थाटली जातात.
आतापर्यंत ११२ दुकाने सील
मनपाने लॉकडाऊनच्या काळात शहरातील विविध भागातील ११२ दुकाने सील केली आहेत. तर २५०पेक्षा जास्त हॉकर्सचे सहित्य जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जी दुकाने सील करण्यात आली होती, त्यापैकी ४० हून अधिक दुकानदारांकडून दंड वसुल करून दुकानांचे सील उघडण्यात आले आहेत तर काहींविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सोमवारी केलेल्या पाहणीत बाजारात मोठी गर्दी आढळल्याने उपायुक्त संतोष वाहुळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार काही हॉकर्सवर कारवाई करण्यात आली.