घरपट्टी वाढीव आल्याने पालिका कर्मचाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:16 PM2019-04-01T22:16:03+5:302019-04-01T22:16:38+5:30
कर्मचारी युनियनची मागणी : हल्लेखोरावर कारवाई करावी
चाळीसगाव : शहरातील संत नामदेव नगर भागात राहणारे सेवानिवृत्त जवान संभाजी विजय पाटील यांच्या घराची घरपट्टी वसुलीची वाढीव आकारणी आल्यामुळे याच भागातील रहिवासी व नगरपालिका घरपट्टी विभागातील कर्मचारी प्रवीण हारपालसिंग तोमर यांचेवर संशय घेऊन त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून मारहाण करण्यात आली.
ही घटना ३१ रोजी सांयकाळी ६.१५वाजता घडली.या मारहाणीचा चाळीसगाव नगरपरिषद कर्मचारी युनियनने निषेध करून हल्लेखोरावर कारवाईची मागणी केली आहे. प्रवीण तोमर हे रविवारी सायंकाळी घराकडे जात असताना पाटील वेल्डिंग शॉप जवळ त्यांना संभाजी पाटील यांनी अडविले व तू माझी घरपट्टी वाढ करण्यासाठी व माझ्या घरात भाडेकरू असल्याचे पालिका कार्यालयात सांगितले आहे. त्यामुळे मला यावेळेस जास्त घरपट्टी आली आहे, असे सांगून त्यांनी तोमर यांना अश्लील शिवीगाळ केली व हत्याराने वार केला. त्यानंतर तोमर यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १ रोजी चाळीसगाव नगरपरिषद कर्मचारी युनियन सचिव देविदास बोदाडे व पदाधिकारी यांनी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. दरमान, पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दोन वेळा तोमर यांचेकडे गेले होते. परंतु त्यांचा जबाब मिळू शकला नाही. जबाबानंतर पोलीसांची कारवाई केली जाणार आहे.