लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुलगुरू पदासाठीच्या निवड प्रक्रियेच्या हालचालींना आता सुरूवात झाली आहे. गुरूवारी व्यवस्थापन व विद्या परिषदेच्या संयुक्त बैठकीत ''कुलगुरू शोध समिती''साठी एका सदस्याच्या नावाची निवड करण्यात आली आहे. लवकरचं हे नाव प्रभारी कुलगुरूंच्या परवानगीनंतर कुलपतींकडे शिफारशीसाठी पाठविले जाणार आहे. दरम्यान, बैठकीत खडगपूर आयआयटीचे प्रा.डॉ.विरेंद्र तिवारी यांच्या नावाची निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांकडून मिळाली आहे.
कार्यकाळ संपण्यापूर्वी प्रा.पी.पी.पाटल यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सद्यस्थितीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, आता कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेसाठीच्या हालचालींना सुरूवात झाली आहे. गुरूवारी प्रभारी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन व विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक पार पडली. कुलगुरू निवडीसाठी सर्व प्रथम कुलपतींकडून ''कुलगुरू शोध समिती'' गठीत केली जात असते. समितीसाठी विद्यापीठाकडून एका सदस्याचे नाव कुलपतींकडे पाठविले जाते. त्या सदस्याच्या नावाची निश्चिती गुरूवारी बैठकीत करण्यात आली. त्यात खडगपूर आयआयटीचे प्रा.डॉ. विरेंद्र तिवारी यांच्या नावाची बैठकीत निवड झाली असून लवकरच त्यांच्या नावाचा शिफारस प्रस्ताव हा कुलपतींकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील, एल.पी.देशमुख, राजू फालक तसेच विद्या परिषद सदस्य अशोक राणे, प्राचार्य आर.एस.पाटील, प्रमोद पवार, युवाकुमार रेड्डी, व्ही.आर.पाटील, छाजेड आदींची उपस्थिती होती.
अशी होईल निवड
कुलगुरू शोध समिती गठीत झाल्यानंतर आधी तिच्या कामास सुरूवात होईल. त्यात कुलगुरू निवडीसाठीचे निकष, पात्रता आणि इतर बाबी निर्धारित होतील. तसेच विद्यापीठाला कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रकाशित करावी लागणार आहे. समितीकडे आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन अंतिम पाच संभावित कुलगुरूंची नावे कुलपती कार्यालयाकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर कुलपती स्वत: त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन कुलगुरू निवडीची घोषणा करतील. या संपूर्ण प्रक्रियेला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
उत्सुकता ताणली
विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर आता कोण विराजमान होईल, त्याची चर्चा सुरू झालेली आहे. सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात कुलगुरू हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत असायला नको, अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, सध्या विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यामुळे निवड झालेल्या कुलगुरूंनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडू नये, अशीही अपेक्षा काहींकडून होत आहे. दुसरीकडे विद्यापीठातील तीन ते चार अधिकारी सुध्दा कुलगुरू पदासाठी दावेदार असून त्यांच्या नावाची चर्चा देखील एेकायला मिळत आहे.