नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड म्हणतात... ‘मी मराठीत शिकलो, हे माझं सौभाग्यच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:31 AM2020-02-24T01:31:38+5:302020-02-24T01:32:09+5:30
मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मराठी भाषेसंदर्भात आपली मतं मांडताहेत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड
‘मी महाराष्टÑात जन्म घेतला आणि ज्या मातीत जन्मलो, त्याच मातृभाषेत मला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेता आले, हे माझे सौभाग्यच, नव्हे तर मराठी भाषेमुळेच मला शिक्षणाची गोडी लागली आणि संस्काराचे धडेही मिळाले म्हणूनच मला आयएएस होता आले’ असे नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड अभिमानाने सांगतात.
डॉ.राजेंद्र भारुड यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीत अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत त्यांचे शिक्षण झाले. पण त्यांची जिद्द, चिकाटी आणि बुद्धीमत्तेपुढे परिस्थितीलाही हार मानावी लागली. आणि डॉ.राजेंद्र भारुड नावाचे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व नव्या पिढीला मिळाले. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी एक स्वप्न पाहिले’ हे पुस्तक आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. सध्या बहुतांश पालकांना मुलाला जर उच्च शिक्षित करायचे असेल तर त्याला इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण दिले गेले पाहिजे, असा समज आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.राजेंद्र भारुड सांगतात, ‘खरे तर इंग्रजीतून शिक्षण घेतले तरच मुलगा उच्चशिक्षित होतो यावर माझा विश्वास नाही. ज्या मातीत तुम्ही जन्माला येतात त्याच मातृभाषेत जर तुमचे प्राथमिक शिक्षण झाले तर ते खऱ्या अर्थाने प्रभावीत ठरते. कारण ती भाषा आपली असते, ते शब्द आपल्या हृदयापर्यंत भिडतात. साहजिकच त्यामुळे शिक्षणाचीही गोडी निर्माण होते. मराठी भाषेबद्दल बोलायचे झाल्यास ही भाषा सुसंस्कृत व समृद्ध भाषा आहे. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. ते माझे सौभाग्यच मानतो. भले त्या माझ्या शाळेला भव्य व आधुनिक इमारतीऐवजी ती शेणाने सारवलेली होती, कौलारू होती पण त्यात आपुलकीचे वातावरण होते. माझे गुरुजी देवरे गुरुजी, पगारे गुरुजी, भारती बाई यांनी दिलेले शिक्षण आजही माझ्या स्मरणात आहे. त्या शाळेत मला जे शिक्षण मिळाले त्यातूनच आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे पालकांना माझे आवाहन आहे की, आपली मुले इंग्रजी शाळेत पाठवली म्हणजे ते उच्चशिक्षित होतीलच असा समज करुन घेऊ नका. कुठलेही बीज लावल्या लावल्या त्याचे फळ मिळत नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाला शाळेत शिक्षणाबद्दल आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. ही आवड विशेषत: स्वत:च्या भाषेतील शिक्षणातूनच मिळू शकते. त्यासाठी मराठी उत्तम पर्याय असून मराठी भाषेचे भविष्य उज्वल असल्याचे ते सांगतात.
(शब्दांकन : रमाकांत पाटील)