नगरपंचायतीसाठी नशिराबादकरांची ग्रामपंचायत निवडणुकीतून सामूहिक माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:46 AM2021-01-08T04:46:14+5:302021-01-08T04:46:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नगरपंचायतीची उद्घोषणा झाल्यामुळे अखेर नशिराबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीतून एकत्रित ८२ उमेदवारांनी सोमवारी सामूहिकरीत्या माघार घेतली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नगरपंचायतीची उद्घोषणा झाल्यामुळे अखेर नशिराबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीतून एकत्रित ८२ उमेदवारांनी सोमवारी सामूहिकरीत्या माघार घेतली. या ऐतिहासिक निर्णयासाठी सोमवारी सकाळपासून जळगाव तहसीलमध्ये नशिराबादकरांची गर्दी जमली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून नशिराबाद येथे नगरपंचायतीसंदर्भात हालचाली सुरू असताना शासनाकडून याची उद्घोषणाही करण्यात आली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रियाही सुरूच होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते. १७ जागांसाठी ८२ उमेदवारी अर्ज आलेले होते. ते वैधही ठरले होते. मात्र, अखेर जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, उपसरपंच कीर्तिकांत चौबे, विनोद रंधे, सय्यद बरकत अली, आसीफ मुगलीक वासीफ भाई यांनी यात पुढाकार घेत अखेर सर्वानुमते माघार घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी अनेक पदाधिकारी हे सकाळपासूनच तहसीलला जमलेले होते.
एका उमेदवारासाठी धावपळ
८२ पैकी ८१ जणांनी एकत्रित माघार घेतली. मात्र, एक उमेदवार न आल्यामुळे पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. तीन वाजेनंतर तहसीलचे गेट बंद झाल्यांनतर काही काळ गोंधळ उडाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
कोट
नशिराबादच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली असून एकही उमेदवार नसल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येईल. तेथून निवडणूक आयोगाला हा अहवाल पाठविण्यात येईल. अप्रत्यक्षरीत्या एकही उमेदवार नसल्याने निवडणूक रद्दच झाल्याचे चित्र आहे.
- नामदेव पाटील, तहसीलदार, जळगाव