गोंडगावच्या तिन्ही बंधूची देशसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:00+5:302021-08-15T04:20:00+5:30
अशोक परदेशी. भडगाव : तब्बल शंभरावर लष्करी जवान देणाऱ्या गोंडगावाची आगळी सैनिकी परंपरा आजदेखील कायम आहे. गोंडगाव येथील ...
अशोक परदेशी.
भडगाव : तब्बल शंभरावर लष्करी जवान देणाऱ्या गोंडगावाची आगळी सैनिकी परंपरा आजदेखील कायम आहे. गोंडगाव येथील साळुंखे कुटुंबातील तीनही भाऊ देशसेवेत आहेत. देशसेवेचा या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. गावाच्या नावाला जोडूनच 'मिलिटरी' हा शब्द रूढ झाला आहे, यावरूनच गावाची महती लक्षात येते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावाला सैनिकी सेवेची परंपरा आहे. या गावातील शंभरावर जण सैन्यात, पोलीस दलात १४ ते १५ जण, तसेच विविध क्षेत्रात अनेक तरुण नोकरीस आहेत. यात काही जण सेवानिवृत्तही झाले आहेत. सेवानिवृत्त सैनिक गावात समाजसेवा करीत आहेत. गावकऱ्यांकडून या जवानांना कडक सॅल्यूट दिला जात आहे. अन् त्यांच्या समाजसेवेच्या कार्यालाही.
सुभाष पुंजू साळुंखे यांची एक एकर जमीन. घरची परिस्थिती साधारण. त्यांचा परंपरागत किराणा दुकानाचा छोटा व्यवसाय ते सांभाळत होते. सुभाष साळुंखे यांना तीन मुले सुरेंद्र, वीरेंद्र आणि शुभम. घरातील बिकट परिस्थितीची जाणीव या तिघा मुलांना होती. ही तीनही मुले शेती कामांसह इतर ठिकाणी मोलमजुरी करत. तीनही जणांनी मिलिटरी भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. देशाचे रक्षण आणि देशाची सेवा करायची असा ध्यास या तिघा भावंडांना लागला होता. नित्याने व्यायाम व रनिंगला जाणे या तिघा भावंडांनी सुरू केले.
चिकाटी, जिध्द, मेहनतीने यशोशिखर गाठण्याचे ध्येय पूर्ण केले. तिघेही भावंडे सैन्यात भरती झाली. या संधीचे त्यांनी सोने केले अन या कुटुंबाला चांगले दिवस आले. सुरेंद्र साळुंखे (३२) याने लदाख, जोधपूर येथे सेवा बजावली आहे. सध्या पुणे येथे नोकरीस कार्यरत आहे. वीरेंद्र साळुंखे (२९) याने ओडिशा, कोलकाता या ठिकाणी सेवा बजावली आहे. शुभम साळुंखे (२६) याची सुरुवातीस कारगीलमध्ये नेमणूक झालेली आहे. गेल्या महिन्यात लोकमतच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात या तीनही भावंडांनी रक्तदान केले आहे.