मोदींचे हस्तक आहात, तर मग इकडचं तिकडं करू नका!, वेदांता फॉक्सकॉनवरून एकनाथ खडसेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:18 PM2022-09-14T18:18:00+5:302022-09-14T18:19:58+5:30
सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून वादाला सुरूवात झाली आहे.
सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉनवरून वादाला सुरूवात झाली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार होता. परंतु आता तो प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर टीका केली.
फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवल्याने एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. “हा प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित व्हावा, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक बाब आहे, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली असती. रोजगार उपलब्ध झाला असता,” असेही खडसे म्हणाले. मागचाही एक प्रकल्प अशाच प्रकारे हलवण्यात आल्याचा आरोपही खडसेंनी केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना भेटून हा प्रकल्प महाराष्ट्रातच व्हावा म्हणून प्रयत्न करायला हवेत, अजूनही वेळ गेलेली नाही. हा राजकीय विषय नाही, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
सुप्रियासुळेंचाही टोमणा
“मी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ, तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा,” असा खोचक टोला त्यांनी उदय सामंत यांच्या प्रतिक्रियेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला. “अडीच वर्ष खुप मोठा वेळ आहे. इतके वर्ष ते का बसले होते. ते खातं शिवसेनेकडे होतं. त्यातले काही लोक शिंदेसेनेत आहेत,” असंही त्या म्हणाल्या. हा राजकारणाचा विषय नाही. राजकारण हे गंभीर असतं. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अर्थिक बाबीचा प्रश्न आहे. सर्व नेत्यांनी एकत्र यावं, राजकारण बाजूला ठेवावं, ही गुंतवणूक मेरिटवर मिळाली होती, ती मेरिटवरच मिळाली पाहिजे. हे आताच्या सरकारचं अपयश असल्याचंही त्या म्हणाल्या.