‘अमृत’मुळे खड्ड्यांचा ताप, त्यात भर म्हणून चिखलाचा मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:46 AM2021-01-08T04:46:10+5:302021-01-08T04:46:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यात मनपाकडून रस्त्यांची दुरुस्ती केवळ नावापुरतीच होते. आता भुयारी गटार योजनेच्या कामाला वेग आला असून, रस्ते मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत. त्यातच बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खोदकाम झालेल्या ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे चिखलात खड्डे व खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांवरच काय पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.
शहरातील असा कोणताच रस्ता शिल्लक नाही की ज्या ठिकाणी खड्डे नाहीत. यामुळे जळगावकर आता या खड्ड्यांना पूर्णपणे वैतागलेले दिसून येत आहेत. एकीकडे सर्वत्र रस्ते खोदण्यात आले असले तरी ज्या भागात अमृतचे काम झाले आहे. त्या भागात नवीन रस्ते तयार करा, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे उपनगरातून मुख्य शहरात काही वस्तू किंवा भाजीपाला घ्यायला येण्यासही आता नागरिकांना धाक पडत आहे. मात्र, मनपा प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांना जळगावकरांच्या व्यथा का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ढीगभर समस्यांना द्यावे लागत आहे तोंड
१. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी असतो, तसेच अनेक मोठी वाहने चाऱ्यामध्ये फसत असल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे.
२. खड्ड्यांची दुरुस्ती मनपाकडून चांगल्या प्रकारे होत नसल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने सर्वच रस्ते चिखलमय झाले आहे.
मनपाच्या चुकांचा फटका
मनपा प्रशासनाने भुयारी गटार योजनेची निविदा काढल्यानंतर त्यात रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर त्या खोदलेल्या चाऱ्या दुरुस्त करण्याची जबाबदारी मक्तेदारावर सोपविलेली नाही. मनपाच्या या चुकांचा फटका जळगावकरांना भोगावा लागत आहे. मक्तेदारावर जबाबदारी सोपविली नसल्याने ही दुरुस्ती करेल तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोदलेल्या चाऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ३० कोटींचे बजेट आवश्यक आहे. मात्र, ते बजेटदेखील मनपा प्रशासनाकडे नाही. यामुळे मनपाची एक चूक जळगावकरांसाठी महागात पडत आहे.
चिखलामुळे दुचाकीस्वार घसरले
भुयारी गटार योजनेच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यात खोदकाम झाल्यानंतर दुरुस्तीदेखील होत नसल्याने आता पाऊस नसल्यास त्या ठिकाणी खडीची समस्या निर्माण होते. बुधवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पसरलेल्या मातीने मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखलात दुचाकी घसरून अनेक जण जखमी झाले आहेत. शहरातील फुले मार्केट, टॉवर चौक, आर.आर. विद्यालय, बसस्थानकामागील परिसरात चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बसस्थानकामागील गल्लीत एकाच ठिकाणी पाच दुचाकीस्वार घसरले होते. त्यानंतर स्थानिक दुकानदारांनी त्या ठिकाणी खोके ठेवून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सावध करण्याचे काम केले.
मनपाचाच रस्ता केला बंद
महापालिकेसमोरच खोदकाम करण्यात आले असून, मनपा कार्यालयात जाण्याचा मार्गदेखील या खोदकामामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गोलाणीच्या बाजूने मनपात प्रवेश करावा लागत आहे. विशेष म्हणजे खोदकाम झाल्यानंतरही तत्काळ दुरुस्ती केली जात नसून, अनेक दिवस खोदकाम झालेल्या चाऱ्या तशाच ठेवून दिल्या जातात. या चाऱ्यांमध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने अनेक ठिकाणी वाहने या चाऱ्यांमध्ये फसत आहेत.
कोट..
पाणीपुरवठा योजनेचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम वेगाने सुरू आहे. यामुळे रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे, तर भुयारी गटार योजनेचे कामदेखील गतीने सुरू आहे. ही दोन्ही कामे लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न आहे. ही कामे संपली तर शहरातील रस्त्यांची कामेदेखील सुरू करता येऊ शकतील.
-अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा