जळगावला भाजपचे नऊ नगरसेवक शिवसेनेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:39 AM2021-03-16T07:39:39+5:302021-03-16T07:40:52+5:30
पक्ष प्रवेशावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत व रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर आदी उपस्थित होते. २७ नगरसेवक रविवारी मुंबईला रवाना झाले होते.
जळगाव/नाशिक : महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असताना सत्ताधारी भाजपमध्ये मोठी फूट पडली आहे. भाजपविरोधात बंड पुकारलेल्या २७ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी सोमवारी दुपारी मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
पक्ष प्रवेशावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत व रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर आदी उपस्थित होते. २७ नगरसेवक रविवारी मुंबईला रवाना झाले होते. त्यापैकी कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे, चेतन सनकत, गजानन देशमुख, सुधीर पाटील, कुंदन काळे, भरत कोळी, किशोर बाविस्कर यांनी शिवबंधन घातले.
दरम्यान, नाशिकही घडामोडींचे केंद्र बनले असून भाजपचे फुटीर नगरसेवक हे शिवसेनेबरोबर नाशिकमध्ये थांबूनच ठाण्याकडे रवाना झाले आहेत. तर जे भाजपा नगरसेवक फुटलेले नाहीत त्यातील सध्या नाशिकमध्येच मुक्कामी असल्याचे वृत्त आहे.