पालिकेच्या सभेत नऊ विषयांना मंजुरी
By admin | Published: June 2, 2015 04:56 PM2015-06-02T16:56:49+5:302015-06-02T16:56:49+5:30
पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली.
नंदुरबार :पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर शहरात डास निर्मूलन औषध फवारणी करण्याचे ठरविण्यात येऊन वित्तीय वर्षाचा जमा आणि खर्चाचा बारमाही हिशेब अहवाल मंजूर करण्यात आला.
पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी अध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विषय पत्रिकेवरील सर्वच नऊ विषय लागलीच मंजूर करण्यात आले. त्यात वित्तीय वर्षाचा जमा आणि खर्चाचा बारमाही हिशेब व अधिनियम १0१ चे अहवाल मंजूर करण्यात आले. शहराच्या उत्तरेकडील भागात जुन्या व नव्या वसाहतीत, दक्षिणेकडील हद्दीतील जुन्या व नव्या वसाहतीत तसेच संजय टाऊन हॉल ते भुरेसिंग ट्रान्सपोर्ट, एकलव्य विद्यालय ते नेहरू पुतळा, गांधी पुतळा ते हाट दरवाजा या भागात नवीन १२३ विद्युत खांब साहित्यासह उभारण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
पालिका क्षेत्रात डास निर्मूलन करण्याकामी जंतूनाशक औषधी फवारणी करण्यासाठी येणार्या दहा लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. चिंचपाडा भिलाटीजवळील स्लॉटर हाऊसमधील ईटीपी दुरुस्ती करणे व जैविक कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी येणार्या खर्चास व तज्ज्ञाच्या नियुक्तीस येणार्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
पालिकेच्या विविध विकास कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षणसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय धुळे यांचे सुधारित दरास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. दादा गणपती मंडळाच्या जागेवर सामाजिक सभागृह बांधणे कामच्या अंदाजपत्रकासही मंजुरी देण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक कटारिया यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, नगरसेवक व विभागप्रमुख उपस्थित होते.