दोन महिन्यांतच महापालिकेची आठ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:22+5:302021-06-01T04:13:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका प्रशासनाकडून सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात पहिल्याच दोन महिन्यांत महापालिका प्रशासनाची दमदार वसुली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाकडून सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात पहिल्याच दोन महिन्यांत महापालिका प्रशासनाची दमदार वसुली झाली असून, एप्रिल व मे महिन्यांत महापालिकेची आठ कोटी रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे. तसेच मिळकतधारकांना या वर्षाची मालमत्ता कराची रक्कम भरणाऱ्यास १० टक्के सवलत देण्यात येणार असून, यासाठी मनपा प्रशासनाकडून ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेची पहिल्या तीन महिन्यांत कोणतीही वसुली झाली नव्हती. यामुळे संपूर्ण वर्षाचा मालमत्ताकराच्या रकमेवर मोठा परिणाम झाला होता. मार्चअखेरपर्यंत केवळ ६० टक्के वसुली होऊ शकली होती. मात्र, यावर्षी महापालिका प्रशासनाने कोरोनावरील नियंत्रणासोबतच वसुलीवरदेखील लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे पहिल्या दोन महिन्यांतच महापालिकेची दमदार वसुली झाली आहे.
दहा टक्के सवलतीत ३० जूनपर्यंतची मुदतवाढ
मालमत्ता कराची रक्कम पहिल्या तीन महिन्यांत भरणाऱ्या मिळकतधारकांना महापालिका प्रशासनाने एकूण रकमेवर दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने ३१ मे पर्यंत मुदत दिली होती. आता या मुदतीमध्ये ३० जूनपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबत मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील यांनीदेखील मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते.