अमळगाव सरपंचांवर अविश्वास मंजूर, तरी सरपंचपद शाबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:28+5:302021-07-01T04:12:28+5:30
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंच छाया मोरे यांच्यावर ११ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे. ...
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंच छाया मोरे यांच्यावर ११ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे. मात्र, अविश्वास मंजूर होऊन देखील ग्रामसभेच्या निर्णयापर्यंत सरपंच पदावर त्याच राहणार आहेत.
२९ रोजी सकाळी ११ वाजता अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी पीठासन अधिकारी मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलावण्यात आली होती.
अमळगाव ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचासह १२ सदस्य असून रेखा संजय चौधरी, चंदना विश्वास पाटील, मिलिंद गुलाबराव पाटील, नाजूक बन्सीलाल पारधी, ललिता विलास चौधरी, रत्नाबाई रमेश चौधरी, नीलेश लक्ष्मण महाले, एकनाथ तिरसिंग भिल, सविता महेंद्र कुंभार, लीलाबाई नामदेव भिल, हर्षवर्धन मोरे आदींनी पीठासन अधिकारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्यासमक्ष अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. सभेसाठी ग्रामविकास अधिकारी हिरालाल वाघ, नितीन ढोकणे यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, लोकनियुक्त सरपंचाबाबत अविश्वास मंजूर झाल्यानंतरदेखील ग्रामसभा बोलावण्याचा नियम असल्याने सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर तो अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी ग्रामसभेबाबत निर्णय घेतील. त्यात ग्रामसभेने जर सरपंचावर अविश्वास मंजूर केला, तरच सरपंच अपात्र ठरविण्यात येतील. मात्र, सरपंच अपात्र ठरल्यानंतर निवडणूक न घेता त्याच प्रवर्गाचा सरपंच ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडण्यात येणार आहे.
दरम्यान, कोविड १९ आणि डेल्टा प्लसच्या भीतीने जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अविश्वास प्रस्तावासाठी जिल्हाधिकारी ग्राम सभा बोलावण्याचा निर्णय घेतील का? याबाबत चर्चेला उत आला आहे. त्यामुळे तूर्त तरी अविश्वास असूनही मोरे यांना काही दिवस सरपंच पदावर राहता येणार आहे.
चाैकट
सरपंचांच्या अनुपस्थितीतच ठराव मंजूर
अविश्वास प्रस्तावाबाबत बोलावलेल्या विशेष सभेसाठी सरपंच छाया मोरे गैरहजर होत्या. त्यांच्या अनुपस्थितीतच अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.