चाळीसगाव : दोन मुलांविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव : संपत्तीत वाटा-हिस्सा देत नाही या कारणावरून वडिलांना शिवीगाळ करून त्यांच्या हातावर लोखंडी रॉड व कोयता मारून त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांच्या दोघा मुलांविरुद्ध शहर पोलिसात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पाच रोजी रात्री शिवशक्ती नगर येथे घडली.
कपिल रामभाऊ पाटील व नरेंद्र रामभाऊ पाटील अशी या दोघा मुलांची नावे आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सेवानिवृत्त कर्मचारी रामभाऊ फकीरा पाटील हे घरासमोर गेटजवळ खुर्चीवर बसलेले असताना त्यावेळी त्यांचा मुलगा कपिल हा दारूच्या नशेत बाहेरून येऊन त्यांना शिवीगाळ केली.नंतर त्याने त्यांच्या डाव्या हातावर लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केली. काही वेळेत दुसरा मुलगा नरेंद्र हा तेथे आल्यानंतर त्याने कपिल यास न आवरता उलट वडिलांशी भांडण करून त्यानेही लोखंडी कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून आला. त्यात त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याजवळ लागल्याने दुखापत झाली आहे. संपत्ती आमच्या नावावर केली नाही तर जिवंत सोडणार नाही अशी
जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ करण्यात आली.
या भांडणातून दीपक राजपूत, रावसाहेब साळुंखे, संजय सोनार अशांनी सोडवा-सोडव केल्याने त्यांची सुटका झाली. त्यांच्या दोन्ही हातांना दुखापत
झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना पाच रोजी रात्री साडेदहा वाजता शिवशक्ती नगर येथे घडली. उपचार घेतल्यानंतर वडील रामभाऊ पाटील यांच्या फिर्यादीवरून त्यांची मुले कपिल व नरेंद्र रामभाऊ पाटील या दोघांविरुद्ध रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल
अहिरे करीत आहेत.