जळगाव : मनपाच्या गुरुवारी झालेल्या महासभेत गैरहजर असलेल्या सात नगरसेवकांवर भाजपा पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्याचा हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर गैरहजर राहणाऱ्या सात नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून याबाबत खुलासे देखील मागविले असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.गुरुवारी मनपाची महासभा घेण्यात आली. या महासभेत मनपाने गाळेधारकांवर लावलेला पाच पट दंडाची रक्कम रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. शिवसेना या ठरावावेळी तटस्थ राहिली तरी बहुमताने हा ठराव भाजपाने मंजूर करून आणला. मात्र, या ठरावाच्या वेळी भाजपाश्रेष्ठींनी सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचा सूचना दिल्यावर देखील भाजपाचे सात नगरसेवक महासभेत गैरहजर राहिले. तर तीन नगरसेवकांनी महासभेच्या दिवशी रजा घेतली होती. त्यामुळे महापौरांची कोणतीही परवानगी न घेता गैरहजर राहणाºया नगरसेवकांवर भाजपा नेतृत्वाकडून कारवाई केली जाणार आहे.१८ नगरसेवकांची होती अनुपस्थितीगुरुवारी झालेल्या महासभेत एकूण भाजपा व शिवसेना मिळून १८ नगरसेवकांची अनुपस्थिती होती. शिवसेनेच्या आठ नगरसेवकांचाही समावेश आहे. यामध्ये मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जयश्री महाजन, शबानाबी खाटीक, इब्राहिम पटेल यांनी रजेचा अर्ज दिला होता. तर राखी सोनवणे, लता सोनवणे, मनोज चौधरी, जिजाबाई भापसे हे चार नगरसेवक गैरहजर होते. मात्र, शिवसेनेने आधीच ५ पट दंड रद्दबाबत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने शिवसेना नगरसेवकांच्या गैरहजेरीने फार फरक पडला नाही.नगरसेवकांना ‘ब्लॅकलिस्ट’ मध्ये टाकण्याचे संकेतमहासभेच्यावेळी भाजपाच्या कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, मीना सपकाळे, दत्तात्रय कोळी, चेतन सनकत, सुनील खडके व रेखा पाटील हे सात नगरसेवक गैरहजर होते. या नगरसेवकांकडून खुलासे मागविण्यात आले. हे खुलासे आमदार चंदूलाल पटेल यांच्याकडे देण्यात आले असून, काही नगरसेवकांनी याबाबत त्यांची भेट घेवून त्यांना गैरहजर राहण्याचे कारण देखील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गैरहजर राहणाºया नगरसेवकांना भाजपाकडून ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकण्याचेही संकेत भाजपाकडून देण्यात येत आहे. पुढे होणाºया महासभांमध्ये गैरहजर नगरसेवकांना कोणताही ठरावास सूचक व अनुमोदक करण्यात येणार नसून, त्यांच्यावर इतर कारवाई देखील होवू शकते. मात्र, रितसर महापौरांची परवानगी घेवून रजा घेणाºया मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, सिंधूताई कोल्हे व अंजना सोनवणे यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.जलसंपदा मंत्र्यांनीही घेतली दखलगाळेधारकांवरील पाच पट दंड रद्दचा निर्णय बहुमताने घेण्याचा सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना दिल्या होत्या. मात्र, तरीही महासभेच्यावेळेस सात नगरसेवक गैरहजर राहिल्याबाबत त्यांनी देखील दखल घेतली असून, त्यांनी या नगरसेवकांवर कारवाईबाबत हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी झालेल्या महासभेसाठी भाजपाचे स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील रजेचा अर्ज टाकला होता. मात्र, त्यांनी रजेचा अर्ज टाकल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी सोनवणे यांना रजा न टाकण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सोनवणे हे महासभेत उपस्थित राहिले मात्र, इतर नगरसेवकांच्या मनातील भिती दूर करण्यास अपयशी ठरले.
भाजपाच्या सात नगरसेवकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:46 AM
मागविले खुलासे
ठळक मुद्देमहासभेला गैरहजर