जळगाव - शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौ.मी. जागा खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिले आहेत. ‘लोकमत’ ने गेल्या तीन दिवसांपासून हा विषय लावून धरला होता. या वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने बुधवारी जे.के.डेव्हलपर्सला ८१ ब ची नोटीस बजावून, सात दिवसांच्या आत ही जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिवाजी उद्यानालगत असलेल्या जे.के.पार्कची जागा १९८९ मध्ये जे.के.डेव्हलपर्सला ३० वर्षे करारांतर्गत देण्यात आली होती. याची मुदत २५ डिसेंबर २०१९ मध्ये संपली होती. याबाबत संबंधित भाडेकरूला जानेवारी २०२० मध्ये ८१ ब ची नोटीस बजावण्यात आली होती. वर्षभर मनपा प्रशासनाने या जागेकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनीदेखील मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर मनपाने ही जागा ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, मनपा प्रशासनाने अनेक प्रकरणांमध्ये ८१ ब ची नोटीस बजावल्या आहेत; मात्र नोटीस बजावल्यानंतर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
मनपाचे ‘थीम पार्क’ चे नियोजन
२०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शिवाजी उद्यानात बीओटी तत्वावर थीम पार्क साकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यादृष्टीनेच आता सुरुवात झाल्याचे नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी सांगितले. या थीम पार्कमध्ये जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या माहितीसह बॉटनिकल गार्डन व बटरफ्लाय पार्क विकसित करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. हाडा यांनी दिली. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे उद्यानांची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे अशा उद्यानांचा विकास करण्यासाठी बीओटी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. शिवाजी उद्यान व मेहरुण परिसरात विविध फुलांच्या रोपांची लागवड करून बटरफ्लाय गार्डन तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक संपत्ती टिकविण्यासाठी जैवविविधतेचे जतन केले जाणार आहे. बीओटी तत्वावर कराराने हे काम देण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे अॅड. हाडा यांनी सांगितले.