लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शनिवारी दुपारी शहरातील काही कोविड रुग्णालयांची अचानक पाहणी केली. यावेळी त्यांना काही रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल केलेले आढळून आले तर काही ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कमकुवत असल्याचे आढळून आल्याने महापालिकेने सहा रुग्णालयांना नोटीस बजावल्या आहेत.
महापौरांसोबत मनपाचे वैद्यकीय अधिकारी शिरीष ठुसे, डॉ. विजय घोलप, डॉ. विकास पाटील,आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, अग्निशमन विभाग प्रमुख शशिकांत बारी उपस्थित होते. रुग्णालयांनी नियमानुसार सर्व बाबींची पूर्तता केली आहे का? यांची तपासणी करीत रुग्णांशी संवाद साधला. यावेळी जेवण, उपलब्ध सुविधा व उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी महापौरांनी रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची मनपातर्फे अँटीजन चाचणी करण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
इन्फो:
या रूग्णालयांना बजावल्या नोटीस
महापौरांनी केलेल्या पाहणीत क्षमते पेक्षा जास्त रुग्ण दाखल करणे, रूग्णालयातील अग्निशमन व्यवस्था कमकुवत ठेवणे, तसेच रुग्णांकडून शासकीय दर पत्रकाप्रमाणे बिल न घेता, अवाजवी बिल रुग्णालय आकारत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी आधार हॉस्पिटल, युनिटी हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, गोल्ड सिटी हॉस्पिटल, ॲक्सन ब्रेन हॉस्पिटल व साधना हॉस्पिटल या सहा हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे.