आता लक्षणे नसलेले बाधित वाढताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:15 AM2021-05-10T04:15:35+5:302021-05-10T04:15:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १५ फेब्रुवारीपासून आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या लक्षणांबाबत वेगवेगळे पॅटर्न समोर येत आहेत. अगदी सुरूवातीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १५ फेब्रुवारीपासून आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या लक्षणांबाबत वेगवेगळे पॅटर्न समोर येत आहेत. अगदी सुरूवातीला लक्षणे नसलेल्यांची संख्या अधिक होती. मात्र, मध्यंतरी गंभीर रुग्ण वाढले. मात्र, आठवडाभरापासून शहरात पुन्हा लक्षणे नसलेल्या मात्र कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढल्याची माहिती आहे. महापालिकेकडून तपासण्यांचा आवाका वाढविण्यात आला असून त्यात ही बाब समोर येत आहे.
कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल झाले असून डबल /म्युटेशन ही संकल्पना दुसऱ्या लाटेत समोर आली असून हे अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. शिवाय यात तरूणांमध्ये गंभीर होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले. शिवाय लहान बालकांमध्येही गंभीर लक्षणे आढळून आली. जी पहिल्या लाटेच्या अगदी विरुद्ध होती. शिवाय हा संसर्ग अत्यंत झपाट्याने होत असल्याने सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये अगदी कुटुंबच्या कुटुंब बाधित होत होते. अनेक कुटुंब या दुसऱ्या लाटेत उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, या दुसऱ्या लाटेची सुरूवात ही अगदी सौम्य पद्धतीने झाली होती. मात्र, ती हळू हळू गंभीर होत गेली.
काय आहे चित्र
गेल्या आठवडाभरापासून महापालिकेच्या पथकाने औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र, यात दर शंभर तपाण्यांमध्ये अधिकांश बाधित हे आम्हाला पंधरा दिवसांपासून कसलीही लक्षणे नसलेले असे सांगतात. खुद्द एका डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तेही स्वीकारायला तयार नव्हते कारण त्यांना एक साधे लक्षणही नव्हते, अशी माहिती आहे. शिवाय ही संख्या वाढत असल्याने कोरोनाने शहरात आपला पॅटर्न बदललाय काय असा एक प्रश्न निर्माण झाला आहे.
आता तसेही लक्षण नाही
सुरूवातीला समोर येणारे लक्षणेविरहीत रुग्णांना तपासणीच्या एक दिवस आधी किरकोळ सर्दी, डोकेदुखी अशी एखादी लक्षणे जाणवायची . तरूणांमध्ये असे बुचकळ्यात टाकणारी लक्षणे मध्यंतरी समोर येत होती. कुटुंबातील कोणी बाधित आढळल्यानंतर तपासणी केल्यानंतर बाधित आढळून आल्यानंतर आपल्याला केवळ एक दिवस सर्दी होती, डोकेदुखी होती, अशी उत्तरे तरूणांकडून यायची असे डॉक्टर सांगतात.
पॉझिटिव्हिटीही घटली
शहरातील रुग्णसंख्याही कमी झाली असून त्यात बाधितांचे प्रमाणही महिनाभरापासून कमी येत आहे. त्यातच आता लक्षणेविरहीत रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. यामुळे संसगार्चा धोका कमी होत असल्याचे सकारात्मक संकेत यातून समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या ही दीडशेच्या खालीच नोंदविली जात आहे.
इंडस्ट्रीलय एरियात ज्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात लक्षणे असलेले बाधित कमी व लक्षणे नसलेले बाधित अधिक प्रमाणात समारे येत आहे. शिवाय शहरातील पॉझिटिव्हिटीही कमी झाली आहे. याचा अर्थ कोरोना विषाणूची तीव्रता कमी झाली असल्याची शक्यता आहे. सुरवातीला हेच चित्र विरुद्ध होते. - डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी मनपा