ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:52+5:302021-06-03T04:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या आता पाच हजारांच्या आत आली आहे. बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या आता पाच हजारांच्या आत आली आहे. बुधवारी कोरोनाचे नवे बाधित १६४ जण आढळून आले, तर ५६० जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ हजार ७५८ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत आली आहे. त्यासोबतच बुधवारी चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
बुधवारी जिल्ह्यात नव्याने १६४ जण बाधित झाले आहेत. त्यासोबतच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ३०६ एवढी झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या ही १ लाख ३३ हजार ९ एवढी झाली आहे. सध्या उपचार घेतलेल्या ४७५८ रुग्णांपैकी ८८६ जणांना लक्षणे दिसून येत आहेत, तर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या ही ४८१ आहे, तर २४२ जण आयसीयूत आहेत.
आठ हजारांच्या वर तपासण्या
बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ५ हजार ९४ अँटिजन आणि ३ हजार ७१७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ११८३ अहवाल प्रलंबित आहेत. राज्य सरकारने ६० टक्के अँटिजन आणि ४० टक्के आरटीपीसीआर करण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने गेल्या काही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या आहेत. सध्या रुग्णसंख्यादेखील कमी आहे.
चारजणांचा मृत्यू
जिल्ह्यात चारजणांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर आणि धरणगाव तालुक्यातील दोन चाळीस वर्षांच्या पुरुषांचादेखील त्यात समावेश आहे.