लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आधी वर्षाला दहा लागणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारावरील एम्फोटिसिरीन बी इंजेक्शनची मागणी अचानक दिवसाला तीसवर गेल्याने या इंजेक्शनचा सर्वत्रच तुटवडा निर्माण झाला असून जळगावातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या इंजेक्शनचाही काळाबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत ज्यांना हे इंजेक्शन लागले त्यांना ते उपलब्ध झाले; मात्र, आठ दिवसांपासून मागणी वाढली असून इंजेक्शन मिळत नसल्याची माहिती आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने या इंजेक्शनची ऑर्डर दिली असून ते कधी येतील, याची नक्की माहिती नसून सर्वत्रच तुटवडा असल्याने त्याची वाट असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्युकरमायकोसिस या आजाराविषयी गेल्या काही महिन्यांपूर्वी कोणाला अधिक कल्पना किंवा माहिती नव्हती, मात्र, अचानकच या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना शिवाय त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे गंभीर चित्र अचानकच समोर आले आहे. आजपर्यंत या औषधी व इंजेक्शनची गरजच पडत नसल्याने याची मागणी अगदीच नगण्य होती. त्यामुळे अचानक मागणी वाढल्याने तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसात अधिक मागणी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात या इंजेक्शनचे तीस व्हायरल येणार असल्याची माहिती आहे.
एका रुग्णाला लागू शकतात ६० डोस
म्युकरमायकोसिसचे एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचे एका रुग्णाला ६० डोस पर्यंत द्यावे लागू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय जळगावात काही रुग्णांना ३५ ते ६० डोस काही रुग्णांना दिले गेले आहेत. रुग्णाला लागण किती यावर हे अवलंबून असते, सलग दोन महिनेही इंजेक्शन द्यावे लागू शकतात, असेही डॉक्टर सांगतात.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची स्थिती
१३ संशयित रुग्ण जिल्ह्यातील शासकीय यंत्रणे
५० पेक्षा अधिक रुग्णांवर जळगावात व मुंबई, पुणे येथे उपचार
१० ते २० इंजेक्शन लागायचे वर्षाला
दररोज ३० पेक्षा अधिक इंजेक्शनची मागणी
संधी साधणारा संसर्ग आहे. प्रतिकारक्षमता कमी असलेल्या रुग्णांना लवकर होतो, अन्य व्याधी असलेल्यांना धाेका अधिक असतो. याचा संसर्गाचा वेग अधिक आहे. नाकाच्या आजूबाजूला काळे डाग पडणे, टाळूवर काळे डाग पडणे, यानंतर हिरड्या काळ्या पडणे यासह त्यातून पू येणे अशी प्राथमिक लक्षणे असतात. ज्या भागात याचा अधिक संसर्ग असतो, तेवढा भाग काढावा लागू शकतो.
- डॉ. इम्रान पठाण, दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख, जीएमसी
म्युकरमायकोसिसचे सहा प्रकार असतात. यात नाकातून मेंदूकडे जाणारा हा कॉमन प्रकार आहे. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत हा फंगस नाकामध्ये पसरतो. हा संसर्ग नाकाच्या खालच्या बाजूला असल्यानंतर लगेच एम्फोिटिसिरीन बी इंजेक्शन दिले जाते. नाकाच्या आत काळसर खपली येते, टाळू काळसर पडू लागतो. स्टेरॉईडचा अतिवापर, अनियंत्रित मधुमेह, प्रतिकारक्षमता कमी यामुळे याचा धाेका अधिक असतो.
- डॉ. नितीन विसपुते, कान, नाक. घसा, तज्ज्ञ
म्युकरमायकोसिस या आजारात डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांच्या हालचालीवर परिणाम होणे अशी लक्षणे यात रुग्णांमध्ये दिसून येतात. गंभीर लागण झाल्यास रुग्णाची दृष्टी जाऊ शकते.
- डॉ. प्रसन्ना पाटील, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग, जीएमसी
इंजेक्शन, औषधी मिळेना
१ गेल्या महिन्यात ज्या रुग्णांना या इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यांना थोड्या कालावधीने ते उपलब्ध झाले होते. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने हे इंजेक्शन आता उपलब्ध होत नसल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांकडून समोर आली आहे.
२ या इंजेक्शनची व औषधोपचारांची एमआरपी किमतच अधिक असल्याने काळ्या बाजारात किती असेल, मात्र, ते इंजेक्शनच उपलब्ध नसल्याने त्याचा काळाबाजार होऊ शकतो, असेही या नातेवाईकांचे म्हणणे आहे. औषधोपचारालाच ५ लाखांपर्यंत खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.
३ एक औषध वीस हजार रुपयापर्यंत असून ते लवकर उपलब्ध होत नाही, असे सांगण्यात आले. एका डॉक्टरकडे नव्हे तर तीन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचार करावे लागत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
तीस इंजेक्शन येणार
या इंजेक्शनचा तुटवडा राज्यभर आहे. आपल्या जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी याची मागणी नव्हती, मात्र, आठ दिवसांपासून मला चार ते पाच ठिकाणाहून या इंजेक्शनबाबत विचारणा झाल्याचे औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव यांनी सांगितले. दरम्यान, येत्या दोन दिवसात ३० व्हायरल जिल्ह्याला प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.