भालोद येथे पोषण आहाराचा आढळला जास्त साठा - मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:24 PM2018-11-03T21:24:16+5:302018-11-03T21:25:05+5:30
भालोद येथील माध्यमिक शाळेचा पोषण आहाराचा तांदूळ रिक्षाव्दारे शाळेबाहेर जात असताना नागरिकांच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवरून तांदळाचा साठा मर्यादेपेक्षा जास्त आढळला. म्हणून शिक्षण विभागाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
यावल/भालोद, जि.जळगाव : तालुक्यातील भालोद येथील माध्यमिक शाळेचा पोषण आहाराचा तांदूळ रिक्षाव्दारे शाळेबाहेर जात असताना नागरिकांच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवरून तांदळाचा साठा मर्यादेपेक्षा जास्त आढळला. म्हणून शिक्षण विभागाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शुक्रवारी तांदळाने भरलेली रिक्षा बाहेर जात असताना गावातील गौरव भालेराव, राहुल भालेराव, भरत भालेराव व शाळेसमोर बसलेल्या काहींनी पकडली होती. नंतर गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांना माहिती दिली. त्यावरून गटशिक्षणाधिकारी शेख व पोषण आहार अधिकारी, गणेश शिवदे, शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख, केंद्रप्रमुख तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या पोषणा आहाराची तपासणी केली. पथकास तपासणीत माध्यमिक शाळेचा नोंदवहीनुसार सुमारे सव्वादोन क्ंिवटल तांदूळ जास्त भरला आहे, तर प्राथमिक दोन क्विंटल १३ किलो तांदूळ जास्त भरला आहे. दोन्ही संस्थांना शिल्लक माल जास्त कसा आहे याबाबतचा खुलासा तत्काळ करण्यात यावा, अशी नोटीस बजावली आहे.