जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासंदर्भात हालचालींना आता अंतिम रूप येत आहे. यामध्ये नगरपंचायतीची अधिसूचना जारी झाली असून, याविषयी हरकती मागविण्यात आल्या आहे. ३० दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे या हरकती सादर करता येणार आहेत.
जळगाव तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या व इतर बाबतीत नशिराबाद गावाचे क्षेत्र वाढणे व १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांसह स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी होती. असे असले, तरी यंदा ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर, त्यात नशिराबाद ग्रामपंचायतीची निवडणूकही होणार होती. निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच, नगरविकास विभागाने नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याविषयी राज्य निवडणूक आयोगाच्या कोणत्याच सूचना नसल्याने, निवडणूक प्रक्रिया सुरूच राहिली. अखेर ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी सामूहिक माघार घेतल्याने नशिराबाद ग्रामपंचायतची निवडणूक झालीच नाही.
आता नगरपंचायत होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला असून, याविषयी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार ३० दिवसांच्या आत हरकती सादर करावयाच्या आहे. या हरकती जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करता येणार असून, त्यावर राज्य शासनाच्या वतीने विचार केला जाणार आहे. नशिराबाद नगरपंचायतीमध्ये आजच्या नशिराबाद ग्रामपंचायतीच्या हद्दीचा समावेश राहणार आहे, असेही नगरविकास विभागाने म्हटले आहे.