वेळेच्या निर्बंधांमुळे मालवाहतुकीत अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:27+5:302021-05-22T04:15:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानांना वेळेचे बंधने घालण्यात आली आहे. या सोबतच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानांना वेळेचे बंधने घालण्यात आली आहे. या सोबतच आता मालवाहतुकीच्या वाहनांना देखील ११ वाजेनंतर अडविले जात असल्याने मालाच्या आवक-जावक वर परिणाम होत आहे. इतकेच नव्हे जळगावातील औद्योगिक वसाहतीमधून इतर ठिकाणी जाणाऱ्या मालासह किराणा साहित्याच्या आवक-जावकवरदेखील परिणाम होऊन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला व तेव्हापासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात ब्रेक द चेन लागू करण्यात आले. त्यापाठोपाठ अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळांनादेखील बंधने घालून ही दुकाने केवळ सकाळी सात ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. दुकानांना वेळेचे बंधने असताना आता मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनादेखील ११ वाजेनंतर अडविले जात असल्याने त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जळगावातील व्यापार मोठा असून या ठिकाणाहून मराठवाडा, विदर्भामध्ये देखील माल जातो तसेच सध्या धान्य खरेदीचा काळा असल्याने जिल्ह्यातील विविध भागासह मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या भागातून धान्याची आवक होत असते. मात्र मालवाहतुकीचे वाहने सकाळी ११ वाजेनंतर अडविले जात असल्याने या सर्वांचा परिणाम होत असल्याचे व्यापारी, वाहतूक संघटनांच्यावतीने सांगण्यात आले. यासोबतच जळगावातील पाईप, डाळ या उद्योगांच्या व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत विविध वस्तूंचे उत्पादन झाल्यानंतर त्यांच्या वाहतुकीवरदेखील परिणाम जाणवत असल्याचे सांगण्यात आले. सध्या साडेतीनशे टन डाळीचे दररोज उत्पादन होत असून ती वाहनांद्वारे इतर पाठविली जाते. तसेच सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने यासाठी विविध भागात पाईप पाठविले जातात. मात्र यामध्ये वाहतुकीला अटकाव केला जात असल्याने अडथळे येत आहे.
या सर्व प्रकारामुळे मालाचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालवाहतुकीस दिवसभर परवानगी असावी, अशी मागणी जळगाव जिल्हा मोटर ओनर्स अँड ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याविषयी दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांची स्वाक्षरी आहे.