बोदवड : ओडीए पाणीपुरवठा योजनेकडे महावितरण कंपनीची ३३ लाख रुपये इतकी थकबाकी असल्याने वीज कंपनीने गुरुवारी सकाळी योजनेचा वीजपुरवठा खंडित केला. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिष्टाई केली. जिल्हा परिषदेने थकीत रक्कम भरल्यानंतर गुरुवारी सायंकाळी वीजपुरवठा पूर्ववत झाला. यामुळे बोदवडवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
तालुक्यातील ५१ आणि सध्या ३० गावांच्या सुरू असलेल्या ओडीएच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिल वाढल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला होता. ही माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना कळताच त्यांनी जिल्हा परिषदेत संपर्क साधला.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाण्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे विभागीय अभियंता यांच्याशी संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य तत्काळ लक्षात आणून दिले. बोदवड तालुक्यात अगोदरच पाण्याची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळात हा तेरावा महिना ठरावा.
गेल्या आठवड्यात पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आला. पुरामुळे ओडीएला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये गाळ अडकला होता. परिणामी ११ जूनपासून बोदवड तालुक्यातील पाणीपुरवठा बंद होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू झाला. त्यात पुन्हा १७ रोजी सकाळी वीज संकट उभे राहिले. त्यासाठी महावितरण कंपनीला थकीत वीज बिलापोटी ३३ लाख ६१ हजार ३५० रुपये रकमेचा धनादेश दिला व वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.