चाळीसगाव (जि. जळगाव) : सतत ओढ देत हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी रात्री जोरदार बॅटिंग करीत चाळीसगाव परिसराला बेसुमार झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे डोंगरी व तितूर नदीकाठालगतचा परिसर जलमय झाला. या दोन्ही नद्या दुथडी भरून वेगाने वाहत होत्या. शिवाजी घाटासह बामोशी दर्गाह परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात पशुधनाची मोठी हानी झाली आहे. शेतांमध्ये पाणी आल्याने पिके वाहून गेली. तर एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. कन्नड घाटात दरड कोसळण्यासह भूस्सखलन झाल्याने वाहतूक ठप्प झाली.
धुळे येथील आपत्ती व्यवस्थापनाची ३० जणांची टीम बोलाविण्यात आली. तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता पाऊस थांबल्याने मदत कार्याला वेग आला होता. सकाळी सहा वाजताच आमदार मंगेश चव्हाण हे प्रशासनाच्या टीमसह नागरिकांच्या मदतीला धावून गेले.
एक अनोळखी मृतदेह वाहून आला
वाकडी येथे कलाबाई सुरेश पवार (वय ६०) या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पिंपरखेड येथे आश्रमशाळेच्या मागील बाजूस बाल्डे नदीच्या पाण्यात एक मृतदेह वाहून आला. कन्नड घाटासह पाटणादेवी परिसरात सोमवारी रात्रीनंतर अतिवृष्टी झाल्याने डोंगरी नदीला मोठा पूर आला.
गेल्या २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चौकट कन्नड घाटात दरड कोसळली
अतिवृष्टीने कन्नड घाटातील स्थिती सर्वाधिक भयावह झाली असून, आठ ते दहा ठिकाणी दरड कोसळून भूस्खखलन झाल्याने रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. यामुळे येथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, येथे अनेक वाहने अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. किमान महिनाभर तरी येथून सुरळीत वाहतूक होण्याची शक्यता नाही. पूरग्रस्तांना विविध संस्थांकडून जेवण वगैरे पुरविले जात आहे.
२४ तासांत ५४६ मिमी पाऊस, १० धरणेही ओव्हरफ्लो
मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी तीन वाजेपर्यंत संततधार कायम ठेवल्याने गत २४ तासांत तालुक्यात ५४६ मिमी पाऊस झाला आहे. चाळीसगाव मंडळात ९२ तर तळेगाव मंडळात सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भडगाव तालुक्यातही तितूरचा हाहाकार
जळगाव जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. भडगाव तालुक्यात साधारण पाऊस झाला असला तरी चाळीसगावमधून येणाऱ्या तितूर नदीला येथे महापूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. काही घरांचे व जनावरांचेही नुकसान झाले आहे.