वृद्ध बहिणीने चुलत भावाला दिली आपली संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 09:44 PM2020-10-18T21:44:45+5:302020-10-18T21:46:39+5:30
मजरे हिंगोणा येथील इंदुबाई बुधा महाले (७८) या वृद्ध महिलेने सख्ख्या चुलत भावाला सर्व मालमत्ता देऊन टाकली.
चोपडा : यापूर्वी मदतीच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत, परंतु ही चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील दानशूर महिलेची चर्चा तालुकाभर नव्हे तर जिल्हाभर सुरू आहे. सध्या स्पर्धेच्या युगात एक रुपयाही कोणी कोणाला देणे लांबचा भाग झालेला असताना मजरे हिंगोणा येथील इंदुबाई बुधा महाले (७८) या वृद्ध महिलेने सख्ख्या चुलत भावाला सर्व मालमत्ता देऊन टाकली. बक्षीस देण्याची या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
इंदुबाई बुधा महाले या महिलेने रोजंदारीवर भिवंडी येथे काम करणारा चुलत भाऊ रामा महाले यास बोलावून सगळे सोपस्कार पूर्ण करून रीतसर कागदपत्रे बनवून स्वकष्टाने कमावलेली सर्व संपत्ती, त्यामध्ये सोने, बांधीव घर, रिकामी जागा, शेती, त्यासाठी बैलजोडी व सर्व साहित्य, वि.का.संस्थेतील शेअर्स, साखर कारखान्यातील शेअर्स हे सगळे भावाला देऊन टाकले आणि प्रत्यक्ष भावाला इथे बोलावून अनभिज्ञ असलेल्या या भावाने तुला द्यायचे आहे, असं सांगितल्यावर मात्र भाऊ आवाक झाला. पोटच्या पोराला किंवा सख्या आई-वडिलांना सध्या या धकाधकीच्या जीवनात प्रॉपर्टी देणे हे दुरापास्त झाले आहे. मात्र दानशूर व्यक्ती या समाजामध्ये आहेत याचेच हे उदाहरण या घटनेतून दिसून येत आहे. महिलेने स्वत:च्या मालकीचे सध्या राहत असलेले भलेमोठे सिमेंट काँक्रीटचे घर, सोन्याच्या दहा तोळ्याच्या बांगड्या, बखळ जागा या हंगामातील आलेले सर्व उत्पन्न, घरात भरून ठेवले आहे ते उत्पन्न अशी लाखो रुपयांची संपत्ती चुलत भावाला देऊन टाकली आहे.
एवढेच नव्हे तर या वृद्ध महिलेने मनातील इच्छा जिवंतपणीच पूर्ण करणार असल्याचे जाहीरही केले आहे. वयाने थकले असताना केव्हाही काहीही होऊ शकते म्हणून जिवंत असतानाच मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मिळत नसल्यामुळे या नवदुर्गा उत्सवाच्या काळातच मौजे आणि मजरे हिंगोणा या दोन्ही गावांमधील संपूर्ण कुटुंबांना ह्यगाव जेवणह्ण देणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. बहिणीने सर्व प्रॉपर्टी भावाला देऊ केल्यानंतर भावाचे डोळे पाणावले. स्वकष्टाने कमावलेली सर्व संपत्ती चुलत भावाला देण्याची ही कदाचित जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात पहिलीच घटना असावी, असेही सर्वत्र बोलले जात आहे.