लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या अर्थसंकल्पाच्या अधिसभा बैठकीला गुरुवारी कुलगुरू नसल्यामुळे सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. कुलगुरूंशिवाय बैठक सुरूच झालीच कशी, बैठक तात्काळ बेकायदेशीर ठरवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असा आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठ प्रशासनाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. अखेर पाऊण तासानंतर कुलगुरूंनी ऑनलाईन बैठकीत हजेरी लावून सर्वांची क्षमा मागितली व बैठक स्थगित करीत वीस दिवसानंतर ऑफलाईन पद्धतीने अधिसभा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोंधळ शांत झाला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची अधिसभेची ऑनलाईन बैठक प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली. डॉ. शामकांत भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव तथा सचिव अधिसभा म्हणून कामकाज पाहिले. सुरूवातीला बैठकीत कुलगुरू उपस्थित नसल्यामुळे अधिसभा सदस्य एकनाथ नेहते यांनी सभेचे अध्यक्ष अर्थात कुलगुरू उपस्थित नसताना बैठक सुरुच झालीच कशी, असा सवाल उपस्थित केला. त्यावर भादलीकर यांनी कुलगुरू हे त्यांच्या वैयक्तिक समस्येमुळे उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगितल्यानंतर बैठकीत एकच गोंधळ उडून सदस्य आक्रमक झाले.
हा तर सदस्यांचा अवमान आहे.....
अत्यंत महत्त्वाची बैठक असताना कुलगुरू उपस्थित राहत नसल्याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे व अनिल पाटील यांनी ही सभा बेकायदेशीर ठरवून बैठक रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. हा सदस्यांचा अवमान असून माफी मागावी अशीही मागणी केली.
अन् बैठक सोडण्याचे केले आवाहन
अर्धा तास उलटूनही कुलगुरूंनी बैठकीला हजेरी न लावल्यामुळे सदस्यांचा संताप अनावर झाला. एक तर बैठक रद्द करण्यात यावी, अन्यथा कुलगुरूंनी आपल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे, असा पवित्रा सदस्यांनी घेतला. अन्यथा कुलगुरूविना बैठक ज्यांनी सुरू केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांमधून जोर धरू लागली. कुलगुरू बैठकीत जॉईन होत नसल्यामुळे अखेर बैठकीत इतरांनी बाहेर पडावे, असाही पवित्रा सदस्यांनी घेतला होता.
कुलगुरू नसताना इतिहासात पहिली सभा
कुलगुरू नसताना विद्यापीठातील अर्थसंकल्पाची बैठक होणे ही विद्यापीठ इतिहासातील पहिली घटना आहे. त्यामुळे ही सभा तात्काळ रद्द करून ती ऑफलाईन पध्दतीने घ्यावी व आता हक्क भंगाचा ठराव करण्यात यावा, असे विष्णू भंगाळे व एकनाथ नेहते यांनी बैठकीत सांगितले.
आपण...क्षमा मागतो....
बैठकीला ४५ मिनिटे झाल्यानंतर कुलगुरू प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी वाहनातूनचं ऑनलाईन हजेरी लावली. नंतर सदस्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी पत्नी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना सभेत उपस्थित होण्यास उशिर झाल्याचे स्पष्ट केले. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करून त्यांनी सर्वांची क्षमा मागितली.
कुलगुरू म्हणाले....अरे मुझे तो बोलने दो...
बैठकीला उशिर का झाला हे सांगत असताना, सदस्यांनी प्रभारी कुलगुरूंवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर मुझे तो बोलने दो अशी विनंती त्यांनी अनेक वेळा केली मात्र, सदस्य त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. घडलेला हा प्रकार हा केवळ माझ्या चुकीमुळे झाला असल्याचे म्हणत कुलगुरूंनी पाच ते सहा वेळा अधिसभा सदस्यांची माफी मागितली. त्यानंतर सदस्यांनी बैठक रद्द करण्याची मागणी रेटून धरली.
आणि...बैठक स्थगित
दरम्यान, अधिसभेतील मोजक्या सदस्यांनी अधिसभेचे कामकाज ऑफलाईन घेण्याचा आग्रह केला. त्यांचा आग्रह विचारात घेऊन अधिसभेचे कामकाज कुलगुरुंनी तूर्त स्थगित केले. विद्यापीठाने ऑफलाईन अधिसभा ३० मार्च रोजी आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज दिला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. शामकांत भादलीकर यांनी कळविले आहे. यावेळी बैठकीत माजी आमदार सतीश पाटील, डॉ.गौतम कुंवर, प्रा.डॉ.अनिल लोहार, प्रकाश अहिराव, डॉ. सुनील गोसावी, ए.टी.पाटील, नितीन ठाकूर, संध्या सोनवणे, संदीप पाटील, प्रशांत सोनवणे, अनिल पाटील, राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.