डांभुर्णीतील खुनप्रकरणी एकास अटक, गावात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:13 PM2020-04-04T17:13:59+5:302020-04-04T17:14:06+5:30
गावात तणाव : ग्रामपंचायतीच्या सामानाची तोडफोड , पोलीस गाडीवर दगडफेक
यावल: तालुक्यातील डांभुर्णी येथील कैलास चंद्रकांत कोळी या १६ वर्षीय तरूणाचा डोळे फोडून निर्घुन खुन केल्या प्रकरणी येथील पोलिसांनी गावातीलच संशयीत यश चंद्रकात पाटील (वय २१) यास शनिवारी सकाळी गावालगतच्या एका शेतात अटक केली आहे. मात्र घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान गावात संतप्त वातावरण असून जमावकडून ग्रामपंचायतीतील २८ हजार रुपयांच्या सामानाची तोडफोड करण्यात आली. संशयीतास जळगावला घेवून जात असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या वाहनावर ममुराबाद जवळ दगडफेक करून वाहनाचे नुकसान केले आहे.
गुरूवारी सायकाळपासून बेपत्ता असलेला कैलास चंद्रकांत कोळीचा मृतदेह शुक्रवारी सांयकाळी गावालगतच्या शेतात आढळून आल्याने शुक्रवारी सायंकाळ पासूनच गावात तणावपुर्ण वातावरण होते. अशातच शुक्रवारी सांयकाळी अज्ञात ५०-६० जणांनी ग्रामपंचायतीच्या दरवाजाला लाथा मारून तो तोडला आणि ग्रामपंचायतीतील टेबल्स, खुर्च्या, पंखे, संगणक, प्रिंटर आदि साहीत्याची तोडफोड करून २८ हजार रुपयाचे नुकसान केले. याबाबत ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खूनातील संशयीत आरोपीस अटक
पो. नि. अरूण धनवडे , हे. कॉ. सुनिल तायडे व सहकाऱ्यांनी संशयीत आरोपी यश चंद्रकांत पाटील यास एका शेतात अटक केली आहे. तो रात्रभर शेतात लपून असल्याची गुप्त माहिती मिळाल्ययावरून पोलिसांनी पहाटे ही काररवाई केली आहे. त्यांनतर संशयीत ओरापीस आमच्या ताब्यात द्या असे संतप्त जमावाचे म्हणणे होते यावल पोलीसांनी त्यास स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या ताब्यात दिल्यानंतर त्यास पोलीस जळगावला नेत असतांना ममुराबद गावाजवळ पोलीसांच्या वाहनावर दगडफेकीचे वृत्त आहे.
मागेही फोडले होते एका बालकाचे डोळे
यश पाटील या आरोपीने मागेही एका बालकाचे डोळे फोडले होते. मात्र उपचार करुन हा बालक सुस्थितीत आला होता. या गुन्ह्यात यश हा मनोरुग्ण असल्याची बतावणी केल्याने त्याची सुटका झाली होती. आता अशाचप्रकारे त्याने डोळे फोडले. एवढेच नाही तर खूनही केला.
तगडा बंदोबस्त
अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, यांना गावात भेट दिली असून तपासाच्या सुचना दिल्यात डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पो. नि. अरूण धनवडे व सहकारी तसेच दंगल निवारण पथक गावात तैनात आहे.