मायेचे ममत्व : ''तो'' बेपत्ता बालक पोलिसांकडून जिल्हा बाल निरीक्षण गृहाकडे सुपूर्द
रेल्वे स्टेशनवरील हरविलेल्या बालकाबाबत पेच : बालनिरीक्षण गृह व मुलाची आई यांच्यातील भावनिक गुंता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रवाशांकडून पैसे मागून जीवन जगणाऱ्या महिलेच्या बेपत्ता झालेल्या मुलाला लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतून आणून, आईकडे न देता, जिल्हा बाल निरीक्षण गृहात दाखल केले आहे. मुलाच्या भवितव्याचा विचार करून, बाल निरीक्षण गृह प्रशासनाने मुलाला आईकडे सुपूर्द केले नसले तरी त्या मातेचा मुलगा ताब्यात मिळण्यासाठी हट्ट सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज बाल निरीक्षण गृहाच्या कार्यालया समोर बसून मुलगा मिळण्याची ही माता प्रतीक्षा करीत आहे.
गेल्या आठवड्यापासून जबलपूर येथील महिला आपल्या पतीसह दोन लहान बालकांना घेऊन जळगावात आली आहे. काजल ठाकूर व शिवा ठाकूर हे दाम्पत्य सध्या जळगाव रेल्वे स्टेशनवर राहत आहे. प्रवाशांकडून कधी पैसे तर कधी खाण्याची जी वस्तू मिळेल, त्यावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात या महिलेचा सात वर्षीय मुलगा स्टेशन परिसरात खेळत असतांना, अचानक बेपत्ता झाला होता. रेल्वे स्टेशनच्या परिसरात सर्वत्र शोध घेऊनही मुलगा दिसत नसल्यामुळे, काजल ठाकूर यांनी पोलिसांकडे मुलगा हरविल्याची तक्रार केली होती. लोहमार्ग पोलिसांनी बालकाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून, तपासाची चक्रे हलविली. यावेळी त्यांना हा बालक खेळता-खेळता गीतांजली एक्सप्रेस मध्ये बसून मुंबईला गेला असल्याचे समजले. त्यानंतर आठवडाभराने या मुलाला जळगावात आणले असून, कागदोपत्री प्रकिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा बाल निरीक्षण गृहकडे कडे सोपवले आहे.
इन्फो :
तर मुलाचे भतिव्यही अंधारात जाण्याची भीती
रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झालेला मुलगा मुंबईत सापडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी हा मुलगा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी या मुलाला आईच्या ताब्यात न देता, जिल्हा निरीक्षण गृहात दाखल केले आहे. माञ,बाल निरीक्षण गृह प्रशासनाला या मुलाच्या भवितव्याची चिंता सतावत आहे. जर या मुलाला आईच्या ताब्यात दिले तर, तो पुन्हा आईसोबत स्टेशनवर प्रवाशांकडून पैसे मागून जीवन जगेल. मुख्य म्हणजे तो शिक्षणापासून वंचित राहणार आहे. यामुळे भविष्यात त्याची जीवन जगण्याची दिशाच बदलेल. त्यामुळे या मुलाचे भवितव्यासाठी बाल निरीक्षण गृहातर्फे त्याला याच ठिकाणी राहू देण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे.
इन्फो :
आईचा जिल्हा बाल निरीक्षण गृहासमोर ठिय्या
मुंबईतून आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या माय-लेकाची रेल्वे स्टेशनवर भेट घडवून आणली. मात्र, या मातेचे मुलाच्या भवितव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होणार असल्याचे पोलिसांना दिसुन आले. तसेच मुलाला आईच्या ताब्यात देण्यापूर्वी योग्य ती कागदपत्रांची प्रकिया पूर्ण होईपर्यंत जिल्हा निरीक्षण गृहात मुलगा सुखरूप राहणार असल्याचे त्या मातेला सांगितले. मात्र, या मातेने माझ्या बाळाला आता कुठेही नेऊ नका, असे सांगत बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात तीव्र विरोध केला आहे. मुलगा परत मिळण्यासाठी स्वातंत्र्य चौकातील बाल निरीक्षण गृहाच्या कार्यालया समोर तासनतास ठाण मांडून बसत आहे. मला काहीही सांगू नका, मला फक्त माझा छकुला परत करा, अशा विणवण्या करतांना दिसून येत आहे. मात्र, एकीकडे मुलाच्या भवितव्याची चिंता आणि दुसरीकडे त्या मायेचे ममत्त्व पाहून, आता काय करावे, असा प्रश्न बाल निरीक्षण गृह प्रशासनाला पडला आहे.
इन्फो :
या मुलाला आईकडे सोपवले तर,तो शिक्षणापासून वंचित राहिल. त्याचा कुठल्याही प्रकारचा विकास होणार नाही. आई सोबत राहून, त्याला ती पैसे मागून जीवन जगण्यासाठी सवय लागेल. परिणामी त्याचे भवितव्य सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे त्या मातेने तिच्या मुलाला बाल निरीक्षण गृहातचं ठेवण्याबाबत आम्ही त्या मातेला समजाविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
ज्ञानेश्वर पवार, अधीक्षक, बाल निरीक्षण गृह,जळगाव