वहीवाट एकीकडून दुसरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 02:25 AM2019-12-25T02:25:57+5:302019-12-25T02:26:11+5:30

वहीवाट हा शब्द अनेक अर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध संदर्भांनी वापरला जातो. याच ‘वहीवाटे’विषयी खास शैलीत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत तावडी बोली भाषेचे अभ्यासक डॉ.अशोक कौतिक कोळी. लेखाचा उत्तरार्ध.

From one side to the other | वहीवाट एकीकडून दुसरीकडे

वहीवाट एकीकडून दुसरीकडे

Next

मामाची मुलगी बायको केली जायची़ त्यातून नात्यांचा विस्तार व्हायचा़ ही वहीवाट एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यत चालू राहायची़ हा प्रकार फक्त मामा, बहिण यांच्यापुरता मर्यादित असायचा, आसं नव्हतं बरं का! तर आत्या, फूई, माम्या, मावशा यांच्याही बाबतीत लागू असायचा़ त्यांचीही आपल्या भावाकडे, भाच्याकडे, मामाकडे, मावसाकडे, बाबाकडे, आजोबांकडे वहीवाट असायची़ त्याही येत-जात असायच्या़ आदर सत्कार घेऊन जायच्या. सुखदु:खात सहभागी व्हायच्या़ ही वहीवाट येण्याजाण्याची असायची सुखदु:खात सहभागी होण्याची असायची़ लग्न कार्यात आंदण घेणे, सुखदु:खात भेटवस्तू-कपडेलत्ते घेणे, आर्थिक-भावनिक-सामाजिक मदत करणे व्हायचे़

त्यातून आपुलकी वाढायची नात्यांची वीण घट्ट होत जायची सामाजिकता वाढीस लागायची घर भरलेलं असायचं. एकटेपणाची भावना नसायची़ आपल्याला कोणीतरी आहेत़ आपल्याला नातेवाईक आहेत़ त्यांचे आपल्याला पाठबळ आहे़ सुखदु:खात मदत करणारं, धावून येणारं आपल्यामागे कोणीतरी आहे, अशी भावना दाटून राहायची़ त्यामुळे मन घट्ट राहायचं़ सुरक्षिततेची भावना दाटून राहायची. अशानं असा माणूस श्रीमंत व्हायचा़
गणगोतावरून माणसाची श्रीमंती ओळखली जायची़ त्याची समाजातली पत ठरायची़ हे गणगोत आपुलकीतून निर्माण व्हायचे़ गणगोत केवळ सख्या नात्यातले असायचे असे नव्हते, तर त्या नात्यांना इतरही कंगोरे आसायचे़ लांबच्या नातेवाईकांच्याही वहीवाटी असायच्या़ तसेच काही रक्ताचे तर काही धर्माचे नातेवाईक असायचे़ ज्या ठिकाणी वावर असला, रहिवास असला त्या ठिकाणीही सहवासातून नातेसंबंध तयार होऊन जात़ त्यांचेही पालन व्हायचे़ अशा ठिकाणी रक्ताचे नसले तरी कर्माचे, धर्माचे, मानुसकीचे नाते तयार व्हायचे़ अशा नात्यांचीही वहीवाट तयार होऊन जायची़ सुख-दु:खातील सहभाग वाढून जायचा़
गणगोत, नातेवाईक यांचेसोबतच काही रोजच्या व्यवहारातीलही वहीवाटी असायच्या. वहीवाट याचा संबंध जाणे-येणे याच्याशी जास्त जवळचा आहे़ ‘वाट’ही त्यात अभिप्रेत आहे़ आपल्या जाण्याचा मार्ग निश्चित करणे, अबाधित राखणे हे जास्त येथे अभिप्रेत आहे़ हक्क प्रशस्त करणे म्हणजेच वहीवाट़ एकदा ती पुसली गेली की पुन्हा प्रस्थापित न होणे किंवा ती करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात़ अशावेळी भास होतो़ कारण ह्या सगळ्या गोष्टींना कायद्याचा, हक्काचा आधार असतोच असे नाही़ हक्क असला तरी तो प्रेमाचा असतो़ आपुलकीचा असतो़ नात्याचा असतो़ अशावेळी नात्याची वीण उसवण्याचीही शक्यता असते़
असे प्रसंग केव्हा उद्भवतात? जेव्हा वहीवाटीमध्ये खंड पडला़ काही कारणांनी वहीवाट बंद पडली़ तेव्हा! जसे की, शेतशिवारातील शेतरस्त्यांच्या बाबतीत असे घडते़ शेतात जाण्यासाठी प्रत्येकाचा रस्ता असतो़ तो परस्पर संमतीने ठरलेला असतो़ काही कारणांनी कटुता निर्माण झाल्यास वहीवाटीच्या ह्याच रस्त्यांवरून वाद उद्भवतात. एवढे की ते पराकोटीला जातात़ कोर्टकचेºया कराव्या लागतात़
इतरही असे प्रसंग असतात़ वहीवाट ही संमतीची असते़ जोरजबरदस्तीची नसते़ मात्र तिला एकाएकी रोखताही येत नाही़ तसे प्रयत्न झाल्यास सर्वसंमतीला, साक्षीपुराव्यांना महत्त्व दिले जाते व वहीवाटदारांसाठी वाट मोकळी करून दिली जाते़ शेत रस्त्यांची वाट अशीच तयार व्हते़ पिढ्यांपिढ्या त्यावरून मग वहीवाट सुरू राहाते़ शेतातल्या झाडांवर, विहिरींच्या पाण्यावरही असाच वहीवाटीने हक्क प्रस्थापित होतो़ शेताच्या वाटण्या झाल्यावर भाऊबंदांचा त्यामधील हिस्सा अबाधित ठिवला जातो़ त्यामध्ये बांदांवरील झाडांचा लाकूडफाटा काढने, काडीबयतन घेणे इत्यादींचा समावेश होतो़
बहुत करून ही वहीवाट आंब्यांच्या झाडांच्या बाबतीत काटेकोर पाळली जात व्हती़ आंब्यांच्या झाडांमध्ये सर्व भाऊबंदांचे सामाईक हिस्से राहात व्हते़ वाटन्या होऊन शेत कुणाच्याही हिस्स्यावर गेले तरी आंब्यांच्या कैऱ्यांमध्ये सर्वांचा वाटा राहात व्हता़ तो ज्याचा त्याला दिला जात व्हता़
- डॉ.अशोक कौतिक कोळी, जामनेर

Web Title: From one side to the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.