चाळीसगावच्या बाजारात कांद्याचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 05:12 PM2021-02-24T17:12:52+5:302021-02-24T17:13:40+5:30
चालू सप्ताहात कांद्याचे भाव चांगलेच खाली आल्याने उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पावसाळी लाल कांद्याची आवक वाढल्याने या सप्ताहात कांद्याचे भाव चांगलेच खाली आल्याने उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. आवक वाढल्यामुळेच भाव उतरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बुधवारी कांदा मार्केटमध्ये प्रतिक्विंटल ११०० ते ३१०० रुपये असे लिलाव झाले. गत आठवड्यात ४२०० रुपये प्रतिक्विंटल अशी दरांमध्ये उसळी होती.
चाळीसगावच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक झाली. कन्नडसह नांदगाव तालुक्यातून शेतकरी येथे कांदा विक्रीस आणतात. सकाळी ११ वाजता लिलावाला सुरुवात झाल्यानंतर भाव खाली कोसळले.
गेल्या आठवड्यात चांगले भाव
गेल्या आठवड्यात आवक मंदावल्याने दरांमध्ये तेजी होती. गेल्या बुधवारी केवळ ४३० क्विंटल आवक झाल्याने ४२०० रुपये प्रतिक्विंटल असे भाव मिळाले. मात्र सद्यस्थितीत दर खाली आल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
बुधवारी १४०० क्विंटल आवक
बुधवारी सकाळपासूनच कांदा मार्केटमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकूण १४०० क्विंटलची आवक नोंदली गेली. आवक वाढल्याने दर मात्र खाली आले. ११०० रुपये ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल असे भाव मिळाले. मंगळवारीदेखील दरांमध्ये मंदी होती. एकूण १३७५ क्विंटल आवक झाली. भाव मात्र ११०० ते ३६०० प्रतिक्विंटल असेच होते.
महागाईसोबत 'कांद्या'चाही मार
इंधनासोबतच गँस सिलेंडरचे वाढलेले भाव आणि त्याला जोडूनच महागाईचा आगडोंब उसळल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर ४० ते ५० रुपये किलो असे असून महागाईसोबतच सामान्यांना कांद्याचाही मार सहन करावा लागत आहे. एकीकडे घाऊक बाजारात मालाला उठाव नसताना किरकोळ बाजारात मात्र दरांमध्ये तेजी असल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.