कांदा दरात तेजीची ‘दिवाळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:12 PM2017-10-24T17:12:03+5:302017-10-24T17:16:48+5:30
चाळीसगाव बाजार समितीत झगमग : नऊ दिवसात 24 हजार 300 क्विंटल आवक
जिजाबराव वाघ । लोकमत ऑनलाईन चाळीसगाव, दि.24 : येथील बाजार समितीत उन्हाळी कांद्याला रविवारी झालेल्या लिलावात 3520 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च दर मिळाला असून ऑक्टोबर महिन्याच्या एकूण नऊ लिलावात बाजार समितीत 24 हजार 300 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. मंगळवारीही भावात तेजी कायम होती. 3200 रुपये प्रतिक्विंटल अशा दराने लिलाव झाले. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, वेहेळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पिशोर आणि पाचोरा, भडगाव येथून कांदा विक्रीसाठी येत आहे. दोन वर्षापूर्वी चाळीसगाव बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी कांदा मार्केट सुरु केले. त्याला आतार्पयत चांगला प्रतिसाद मिळाला असून आठवडय़ातून चार दिवस कांद्याचे लिलाव केले जातात. तेजीची झळाळी येथील कांदा मार्केटमध्ये एक ते 23 ऑक्टोंबर दरम्यान नऊ वेळा लिलाव झाले. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत रविवारी 22 रोजी उन्हाळी कांद्याला 3520 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला. यामुळे कांदा उत्पादक सुखावले असून त्यांच्यासाठी भावातील ही तेजी दिवाळी सारखीच असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. नाशिक जिल्ह्यातूनही आवक नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात कांदा लागवडीचे मोठे क्षेत्र असून येथूनही मोठ्या प्रमाणात चाळीसगाव बाजार समितीत कांद्याची आवक होत आहे. त्या जिल्ह्यातील भावापेक्षा चाळीसगाव येथे मिळणारे दर चांगले आहे. याबरोबरच पेमेंटही लवकर मिळत असल्याचे नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी महेश चकोर यांनी सांगितले. पावसाळी कांद्याचे मोठे नुकसान उन्हाळी कांद्याला चढे दर मिळत असले तरी मध्यंतरी परतीच्या वादळी पावसामुळे पावसाळी कांद्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हे पिक फारसे हाती आले नाही. शेतक-यांना उन्हाळी कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. तीन महिन्याचे पीक कांदा पीक अवघे तीन महिन्यात येते. यामुळेच खान्देशात गेल्या आठ ते दहा वर्षात कांदा लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. गिरणा परिसरात कांदा लागवडीचा नाशिक पॅर्टन चांगलाचा यशस्वी आणि लाभदायी ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-यांनी गिरणा पट्टय़ात येऊन ठराविक दराने कांदा लागवड केली असून आता मोठय़ा संख्येने गिरणा परिसरातील शेतकरीही कांदा लागवडीकडे वळले आहेत. पावसाळी कांद्याने रडविले उन्हाळी कांद्याने शेतक-यांना ऐन दिवाळीत काहीसे हसविले असले तरी मध्यंतरी झालेल्या पावसाचे पाणी शेतात साचून राहिले. यात कांदा पीक भिजले. काही ठिकाणी ते कुजले तर बुरशीचाही त्याला विळखा पडला. परिणामी पोळ्याला लागवड झालेले पावसाळी कांद्याचे पिक दिवाळीनंतर हाती येण्याच्या वेळीच अस्मानी मार बसल्याने हे वेळापत्रक कोलमडले, असे मेहुणबारे येथील शेतकरी संजय तुकाराम बोलकर यांनी सांगितले. यामुळे चाळीसगाव बाजार समितीत महिन्याभरात पावसाळी कांद्याची अल्पशीही आवक झाली नसल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.