आजपासून शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती : सुविधा नसल्यास विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात होत असून या दिवशी शाळेची घंटा वाजण्याऐवजी यंदाही ऑनलाइन शिक्षणानेच सुरुवात होणार आहे;मात्र यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक शिकवू शकणार असल्याचा पर्यायदेखील शिक्षण विभागाने ठेवला आहे. १५ जूनपासून शाळांमध्ये शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्याविषयी राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा असून सध्या ऑनलाइन शिक्षणानेच सुरुवात होऊ शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे गेल्यावर्षी शैक्षणिक वर्षाला जून महिन्यात सुरुवात होऊन शाळा उघडू शकल्या नव्हत्या. दिवाळीनंतरही ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यानंतर संसर्ग कमी झाल्याने शाळा टप्प्याटप्प्याने सुरु झाल्या; मात्र नंतर संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने शाळा बंद झाल्या व परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. १४ जूनपर्यंत शैक्षणिक सुट्या जाहीर झाल्या. त्यानुसार आता १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे; मात्र कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने राज्य सरकारनेही शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे जिल्ह्यात १५ जूनपासून ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात होणार असून शिक्षकांना १०० टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
ऑफलाइनचा पर्याय
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सुविधा नाही त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक शिकवू शकणार आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणासह ऑफलाइन शिक्षणाचाही पर्याय शिक्षण विभागाने ठेवला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असले तरी सध्या ऑनलाइन पद्धतीनेच परवानगी आहे. प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस सुरू होण्याविषयी राज्य सरकार निर्णय घेईल, त्यानुसार निर्देश मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
१५ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक वर्षास सुरुवात होत आहे; मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सुविधा नाही, त्यांच्याकडे शिक्षक जाऊन त्यांना शिक्षण देऊ शकतात. १५ जूनपासून शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती राहणार आहे.
- बी.एस. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.