आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लस ६ लाख ८५ हजार नागरिकांनी घेतली आहे. त्यात ५ लाख ३८ हजार ७७८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर १ लाख ४६ हजार ५८१ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. एकूण ६ लाख ८५ हजार ३५९ नागरिकांना २८ जूनपर्यंत कोरोना लस मिळाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये मिळून २ लाख ३५ हजार ७४७ डोस दिले गेले आहेत. एकूण लसीकरणाच्या ३० टक्के डोस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देण्यात आले आहेत.
१६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आधी आरोग्य कर्मचारी, नंतरच्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि आता सर्वांनाच कोरोना लस दिली जात आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनानेदेखील कोरोना प्रतिबंधात्मक लस नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
कोरोना लसीकरणात सर्वांत जास्त डोस २ लाख ३५ हजार ७४७ डोस हे प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले आहेत, तर ४९ हजार २७५ नागरिकांचे लसीकरण पंतप्रधान जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयांमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात ८ हजार ७३ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर २ हजार १३७ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एकूण डोस - ६ लाख ८५ हजार ३५९
पहिला डोस - ५ लाख ३८ हजार ७७८
दुसरा डोस - १ लाख ४६ हजार ५८१
एकूण आरोग्य केंद्रे ७७
आरोग्य केंद्रांमध्ये झालेले लसीकरण - २ लाख ३५ हजार ७४७